सोलापुरातील बनावट विडी उत्पादकांचा रात्रीस खेळ चाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:41 AM2019-12-19T11:41:44+5:302019-12-19T11:44:25+5:30
उत्पादक, विक्रेते, मार्केटिंगवाल्यांची साखळी; अधिकृत ब्रँडवाल्यांची वाढली डोकेदुखी, बाजारात बसतोय मोठा फटका
सोलापूर : सोलापूरसह देशभरातील लाखोंना रोजगार देणारा उद्योग म्हणून विडी उद्योगाची ओळख आहे़ सध्या या उद्योगाला बनावटीचे भूत पछाडलेले आहे़ अधिकृत विडी कंपन्यांच्या नावे लेबल लावून बनावट विड्या विकण्याचा गोरख धंदा सोलापूरसह संपूर्ण राज्यात सुरु आहे. अनधिकृत अशा बनावट उत्पादनाचा धंदा शक्यतो रात्रीस चालतो़ परप्रांतातील टोळी यात सक्रिय आहे़ याचा फटका येथील विडी कंपन्यांना बसत आहे़ यामुळे पंधरा ते वीस टक्के अधिकृत विड्यांचे उत्पादनही घटले आहे.
अधिक माहिती देताना सोलापूर जिल्हा विडी उत्पादक संघाचे प्रवक्ते बाळासाहेब जगदाळे यांनी लोकमतला सांगितले, बनावट विड्यांचे उत्पादन घेणाºयांची मोठी साखळी कार्यरत आहे़ तयार करणारे एक, बनावटीचे लेबल लावणारे दुसरेच आणि विकणारे तिसरेच त्यामुळे त्यांचा बनावटीचा गोरख धंदा नजरेस पडत नाही़ बनावट विड्यांचे उत्पादन आणि विक्री करणाºयांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत.
याबाबत आम्ही वारंवार तक्रार करतोय, याकडे कोणाचेही लक्ष नाही़ विडी उत्पादक संघाने रात्री काही ठिकाणी छापे टाकून पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी काहींवर कारवाई केली़ काही दिवस बनावटीचे उत्पादन थांबल्याची चर्चा होती, पण आता पुन्हा त्यांचा सुळसुळाट वाढला आहे़ गल्लीबोळात त्यांचे उत्पादन सुरु असते़ गरीब विडी कामगार रोजीरोटीसाठी त्यांच्याकडे काम करतात़ या बदल्यात कामगारांना कमी मोबदला मिळता़े़ बनावट विड्यांचे लेबल लावणे, त्याची वाहतूक करणे हे सर्व काम शक्यतो रात्री चालते़ त्यामुळे या गोरख धंद्यात अनेकांचे हात गुंतलेले आहेत़ त्यामुळे त्यांचे फावते़ ते कामगारांना कमी मजुरी देतात, त्यांना पीएफ देत नाहीत, त्यांना कसल्याही सामाजिक सुविधा देत नाहीत. तसेच जीएसटीही भरत नाहीत. त्यामुळे अशा बनावट विडी उत्पादकांवर शासनाच्या विविध विभागांकडून कडक कारवाई होणे गरजचे आहे. (क्रमश:)
कामगार बेकार होतील- जगदाळे
- आम्ही शासनाकडून अधिकृत परवाना घेतलेला आहे़ नियमितपणे विविध कर भरतो़ जीएसटीही भरतो़ तसेच कामगारांना पीएफ देतो, बोनस देतो, हक्क रजा मिळवून देतो तसेच पेन्शनही देतो़ अधिकृत कंपनींवर लाखो कुटुंब अवलंबून आहेत़ गेल्या काही वर्षात आमच्या विडी उद्योगात बनावट विड्यांचे उत्पादन घेणाºयांची संख्या वाढली आहे़ याचा थेट फटका अधिकृतवाल्यांना बसतोय़ बनावटीमुळे विडी उद्योगावर प्रचंड परिणाम झाला असून, तब्बल पंधरा ते वीस टक्के मार्केट कमी झाला आहे़ बाजारातून अधिकृत विड्यांना उठाव नाही़ परप्रांतातून देखील येणारी मागणी खूप कमी झाली आहे़ काही उद्योजक दुसºया उद्योगाकडे वळत आहेत़ ही मोठी चिंतेची बाब आहे़ भविष्यात हा उद्योग बंद पडू शकतो़ तसे झाल्यास लाखो कामगार बेरोजगार होतील़ या बनावटखोरांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी बाळासाहेब जगदाळे यांनी केली़
मी जुने विडी घरकूल येथील एका विडी उत्पादकाकडे विडीचे काम करते़ मला रोज मजुरी मिळते़ पीएफ, बोनस तसेच इतर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत़ अधिकृत कंपन्यांकडे भरती बंद असल्याने गल्लीबोळात विडी उत्पादन घेणाºयांकडे विडी काम करते़ रोज शंभर रुपये मिळतात़ यावर माझे कुटुंब चालते़ तयार विड्या रात्री आणा असे ते सांगतात, म्हणून आम्ही सायंकाळी सातनंतर तयार विड्या त्यांच्या दुकानात देऊन येतो़
-पार्वतीबाई,
विडी कामगार