बेवफा कोण..तो का ती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:12 PM2019-02-11T12:12:49+5:302019-02-11T12:13:16+5:30

कालच्या एका वर्तमानपत्राच्या अंकात पत्नी दुसºयासोबत पळून गेल्याने पतीची मुलासह आत्महत्या! ही बातमी वाचली  आणि मन तीस वर्षे मागे ...

False angle..why she? | बेवफा कोण..तो का ती ?

बेवफा कोण..तो का ती ?

Next

कालच्या एका वर्तमानपत्राच्या अंकात पत्नी दुसºयासोबत पळून गेल्याने पतीची मुलासह आत्महत्या! ही बातमी वाचली  आणि मन तीस वर्षे मागे गेले. अशाच प्रकारची घटना घडलेला खटला मी चालविला होता. त्या खटल्यातील पतीनेदेखील गळफास लावून आत्महत्या केली होती. पण का ? आपल्या आजच्या कोर्ट स्टोरीतील दोषी कोण? तो, का त्याची नटवी प्रेयसी, का त्याची (पतिव्रता) बायको ? वाचकांनो तुम्हीच उत्तर द्या. 

त्याला खुनाच्या आरोपावरुन अटक केलेली होती. तो कसाबसा रखडत एस.एस.सी़ पास झालेला. दिसायला ‘हिरो’ पण डोक्याने एकदम ‘झीरो’! अभ्यासापेक्षा इतर गोष्टींतच जास्ती रस. कसा तरी एकदाचा नोकरीला लागला. आॅफिसमधीलच एका नवºयाने सोडून दिलेल्या वाह्यात नटवीच्या नादी लागला. पगारातील एकही पैसा घरी देत नव्हता. त्या नटवीवरच सर्व पगार उधळायचा. त्याच्या वडिलांच्या कानावर हे आले़ त्यांनी दिवट्या चिरंजीवाला समजावून सांगितले. पण तो ऐकत नव्हता. त्या नटवीची बदली दुसºया गावाला झाली. तिच्यासाठी वेडापिसा झालेल्या या बहाद्दरानेदेखील तेथे बदली करुन घेतली.

निर्लज्जपणे दोघे एकत्रात राहत होते. अशा वाह्यात मुलाचे लग्न केले तर लग्नानंतर तरी तो सुधारतो, अशा खुळचट कल्पना आपल्याकडे आहेत. त्याप्रमाणे त्याचे एका बाळबोध घराण्यातील मुलीबरोबर लग्न करून दिले. शनिवार-रविवारी तो घरी येई. सोमवारी नोकरीच्या गावी परत जाई. घरी आल्यावर तो बायकोशी नीट बोलतदेखील नसे. तिला टाळत असे. तिच्याशी त्याने ‘कसलाही’ संबंध ठेवला नाही. दिवसामागून दिवस जात होते. तिच्या माहेरचे तिला गोड बातमीबद्दल विचारत असत. परंतु बिचारी काय सांगणार? सासरी समृध्दी होती, परंतु तेथे ती जिवंत असून मरणयातना भोगत होती. 

 पुढे एकदा त्या नटवीला दुसरा पैसेवाला मिळाला. त्यामुळे ती त्याला टाळू लागली. त्याला तिच्याबद्दल संशय येऊ लागला. त्याने तिच्यावर पाळत ठेवली. एकेदिवशी तो सुट्टीच्या दिवशी घरी न जाता तेथेच राहिला. नटवीला वाटले तो गावी गेला असेल. तिने नवीन प्रियकराला घरी बोलावले. तो पाळतीवरच होता. त्याने दोघांना ‘रंगेहाथ’ पकडले. तिच्याच घरची सुरी घेऊन तिला भोसकले. प्रियकर पळून गेला. तो तडक पोलीस स्टेशनला जाऊन हजर झाला. गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. पळून गेलेला प्रियकर शेवटपर्यंत पोलिसांना साक्षीसाठी सापडला नाही.

यथावकाश न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु झाली. सुनावणीदरम्यान त्याचे आई-वडील कोर्टात येत होते. त्याची बायको मात्र कोर्टात येत नव्हती. त्याच्या वडिलांनी सांगितले की, नवºयाला अटक झाल्यानंतर तिला सर्व काही समजले. सासू-सासºयांना त्यांच्या ‘गुणी बाळा’चे सर्व काही प्रताप माहीत असतानादेखील त्यांनी त्याचे लग्न तिच्याबरोबर लावल्याचेदेखील तिला समजले. याबाबत तिने सासू-सासºयांना जाब विचारला. त्यावर उत्तर नसल्याने सासू-सासरे हतबल झालेले. त्यांनी तिची माफी मागितली. मात्र तिने त्यांना माफ केले नाही. तुम्हा सर्वांना जन्माची अद्दल घडवेन, असे निक्षून सांगून रागाने ती माहेरी निघून गेली. 

खटल्यामध्ये नेत्र साक्षीदार नव्हता. आरोपीचा पोलिसांपुढील जबाब अग्राह्य आहे, असा अ‍ॅग्नू नागेशा विरुध्द बिहार सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन आम्ही केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि त्याची निर्दोष मुक्तता केली. एका वर्षानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याचे आई-वडील त्याला घेऊन आॅफिसला आले. मी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. झालेली घटना विसरुन जा. ते एक तुला पडलेले वाईट स्वप्न होते, आता नव्या उमेदीने आयुष्याला सुरुवात कर, बायकोकडे जाऊन तिची सरळ माफी माग आणि नवीन संसाराला सुरुवात कर, असे समजावून सांगितले. सर्वजण आनंदात निघून गेले. 

 आठच दिवसांत त्याचे वडील रडत रडत आॅफिसला आले. आबासाहेब, पोराने गळफास घेऊन जीव दिला की हो.. दोन्हीही बाया बेवफा निघाल्या, असे म्हणत ते ढसाढसा रडत होते. त्यांना पाणी पिण्यास दिले. समजूत घातली. त्यांनी सांगितले, मुलगा बायकोला आणायला सासरी गेला. बघतो तर बायको गरोदर. बायकोशी एकही शब्द न बोलता तो त्या पावलीच परत आला. आई-वडिलांना सर्व काही सांगितले. सारेच हादरुन गेले. त्याचे वडील मला म्हणाले- आबासाहेब, ती नटवी बेवफा निघाली, बायकोदेखील बेवफा निघाली आणि त्या दोघींमुळे माझ्या मुलाचा जीव गेला.

 माझ्या मनाला प्रश्न पडला, ती नटवी तर बेवफाच होती, तोदेखील बेवफाच होता, परंतु पतिव्रता बायकोशी प्रतारणा करुन बेवफाई करणाºया त्याला जन्माचा धडा शिकवणाºया बायकोला बेवफा म्हणता येईल का ? 
 वाचक हो, तुम्हीच विचार करा आणि यावर निर्णय द्या. 
- अ‍ॅड. धनंजय माने 
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

Web Title: False angle..why she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.