प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंब सोडताहेत घरं; नातेवाईकांच्या घरी आता शोधताहेत आसरा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 03:43 PM2020-04-30T15:43:27+5:302020-04-30T15:44:26+5:30
संचारबंदी शिथिलतेच्या काळात पलायन; तीनशेहून अधिक लोकांना नवीन विडी घरकुलातून लावले परतावून
सोलापूर : दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी करता सकाळी काही वेळेची सूट देण्यात आली आहे. याचा फायदा घेत सीलबंद एरियातील काही नागरिक दुसºया एरियातील आपल्या नातेवाईकांकडे आसरा शोधण्याचा प्रयत्न करताहेत. मंगळवारी व बुधवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून काही नागरिक हातात पिशव्या घेऊन आपल्या नातेवाईकांकडे जाताना दिसले. पोलिसांची नजर चुकवत गुपचूपपणे सीलबंद एरियातून बाहेर पडण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे.
नवीन विडी घरकूल परिसरात अशा लोकांचा शिरकाव होत होता. अशा तीनशेहून अधिक नागरिकांना नवीन घरकूल परिसरातून परतवून लावल्याची माहिती ‘सिटू’ च्या कार्यकर्त्यांनी दिली.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पाच्छा पेठ, दत्तनगर, कुचन नगर, जमखंडी पूल परिसरासह सोलापुरातील जवळपास १७ किलोमीटर एरिया सील झालेला आहे. शहरातील मोठा परिसर अनिश्चित काळासाठी सील झाल्याने लोकांची धाकधूक वाढली. सीलबंद परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सीलबंद परिसरातील लोक तणावग्रस्त आहेत. यातून सुटका मिळविण्यासाठी सकाळी लवकर उठून काही लोक आपल्या नातेवाईकांच्या घरी आसरा शोधण्याचा प्रयत्न करताहेत.
सकाळी सहा वाजता....
- सकाळी सहा ते आठ दरम्यान गुरुनानक चौक, बोरामणी नाका परिसर तसेच शांती चौक ते नवीन विडी घरकूलकडे जाणाºया मार्गावर तुम्हाला अनेक लोक हातात पिशव्या घेऊन बाहेर फिरताना दिसतील. यातील बहुतांश लोकांना विचारल्यास भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडल्याचे सांगतात. कदाचित ते खरे असेल. काहींच्या पिशवीत कपडे आणि औषधे सापडतील. अधिक विचारपूस केल्यास कोणीतरी सांगतील की मुलीकडे चालले, काकांकडे चाललोय, मामांकडे चाललोय म्हणून. परंतु त्यातील बहुतांश लोक हे दुसºया एरियात आसरा शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येईल. सकाळच्या सत्रात सीलबंद एरिया परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही कमी असतो. फायदा घेत काही लोक बाहेर पडतात. जुना विडी घरकूल, नवीन विडी घरकूल, नीलम नगर, अशोक चौक परिसरात आसरा शोधणाºयांचे प्रमाण अधिक आहे.
सीलबंद एरियातून बाहेर पडून काही लोक नवीन विडी घरकूल परिसरात येत होते. अशा सर्व लोकांचा आम्ही शोध घेतला आहे. काहींना पोलिसांच्या हवाली केले आहे तर काहींना आम्ही घरकूल परिसरातून परतवून लावले आहे. तीनशेहून अधिक लोकांना आम्ही नवीन विडी घरकूल परिसरातून परतवून लावले आहे. सुरुवातीच्या काळात याचे प्रमाण सर्वाधिक होते, यावर आता आम्ही नियंत्रण मिळवलं आहे.
- वसीम मुल्ला,
सिटू कार्यकर्ता, कुंभारी विडी घरकूल परिसर