फॅन्सी राख्यांनी पाडली सोलापूरातील बाजारपेठेला भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:30 PM2018-08-23T13:30:02+5:302018-08-23T13:32:08+5:30
मागणी स्टोन राख्यांनाच : पारंपरिक राख्या माघारल्या
गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : आधुनिक युगातील बदलत्या जमान्यात राख्यांनी आता आकर्षक रूप घेतले आहे. या सणाचा बाज कायम असला तरी राख्यांचे पारंपरिक रूप मात्र पालटले आहे. चायनिज आणि फॅन्सी राख्यांनी बाजारपेठेला विशेषत: बच्चे कंपनीला भुरळ घातली असली तरी महिला वर्गाची पसंती मात्र स्टोनच्या नाजूक राख्यांनाच आहे.
येत्या २६ आॅगस्टला राखी पौर्णिमेचा सण आहे. यासाठी सोलापूरचीबाजारपेठ सजली आहे. एकावर एक राखी फ्री अशा पाट्या दुकानांपुढे झळकवित सध्या धडाक्यात विक्री सुरू आहे. चार दिवसांवर आलेल्या या सणाच्या निमित्ताने बाजारात महिला वर्गाची आणि त्यांच्यासोबत येणाºया बच्चे कंपनीचीही गर्दी वाढली आहे.
सोलापूरच्या बाजारात यंदा प्रथमच नमो राखी, कासव राखी, खेळण्यांचा कॉम्बो पॅक असलेली मुलांची राखी आली आहे. १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या राख्या सध्या येथे उपलब्ध आहेत. फॅन्सी, मॅजिक, स्टोन, टेडीबेअर, कॉम्बो पॅक, नमो, रुद्राक्ष, कासव, गणेश, चंदन, मेटल यांसह कितीतरी प्रकारच्या राख्यांनी सोलापूरची बाजारपेठ सजली आहे.
सोलापुरातील मुख्य बाजारात राख्यांचे ७० ते ८० विक्रेते आहेत. यासोबत शहरातील अनेक भागात असलेल्या दुकानांमधूनही त्या विकल्या जातात. या सणाला राख्यांच्या विक्रीतून १५ दिवसांत सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते, अशी माहिती राख्यांचे विक्रेते रवींद्र मेरगू यांनी दिली. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असल्या तरी महिलांची पसंती मात्र स्टोनच्या नाजूक राख्यांनाच आहे.
अमेरिकन डायमंडच्या राख्यांनाही स्टोनखालोखाल पसंती आहे. या राख्यांची किंमत ९० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आहे. बच्चे कंपनीची पसंती लक्षात घेऊन डोरेमान, मोटूपतलु, क्रिश यांसह खेळण्यांचा कॉम्बो पॅक असलेल्या आकर्षक इलेक्ट्रॉनिक राख्याही बाजारात आल्या आहेत. ५० ते ६० रुपयांपर्यंत या राख्या उपलब्ध आहेत. देवराख्यांची मागणीही पूर्वीसारखीच कायम आहे. दररोज रेशीम गोंड्याच्या सरासरी एक हजार राख्या मोठ्या दुकानातून विकल्या जातात. राख्यांची किंमत कितीही वाढो, सणापुढे आणि बहीण-भावाच्या पवित्र प्रेमापुढे किंमत कमीच आहे.
पारंपरिक राख्यांची मागणी घटली
- - स्पंज आणि चमकीदार राख्या एकेकाळी महिलावर्गाचे आकर्षण होत्या. मात्र आता या प्रकारच्या पारंपरिक राख्यांची मागणी घटली आहे. या राख्या अन्य राख्यांच्या तुलनेत स्वस्त असल्या तरी मागणी मात्र दोन टक्क्यांवरच आली आहे. मागणीच नसल्यामुळे उत्पादनही घटले आहे. परिणामत: स्थानिकांना या सणाच्या निमित्ताने मिळणारा रोजगारही थंडावला आहे.
सुबक राख्यांचा ग्राहकांना मोह
- - बाहेरून राख्यांचे सुटे भाग आणून त्यापासून राख्या तयार करण्याचा व्यवसाय आजही काही प्रमाणात सोलापुरात सुरू आहे. यात स्टोन, स्पंज, जरीच्या राख्यांचा समावेश आहे. मात्र बाहेरून येणाºया राख्यांमध्ये सुबकता अधिक असल्याने या राख्यांकडे ग्राहक फारसे मिळत नसल्याचा विक्रेत्यांचा अनुभव आहे.