सोलापूरचा फराळ पोस्टाने जातोय अमेरिका, लंडन, सिंगापूर अन् ऑस्ट्रेलियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 12:11 PM2021-11-04T12:11:28+5:302021-11-04T12:11:35+5:30

अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांनाही दिवाळी फराळ

Faral from Solapur goes by post to USA, London, Singapore and Australia | सोलापूरचा फराळ पोस्टाने जातोय अमेरिका, लंडन, सिंगापूर अन् ऑस्ट्रेलियात

सोलापूरचा फराळ पोस्टाने जातोय अमेरिका, लंडन, सिंगापूर अन् ऑस्ट्रेलियात

Next

सोलापूर : लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असतानाच विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूरचा फराळ पोस्टाने परदेशात जात आहे. दिवाळी सणात विदेशातील आपल्या आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथे फराळ पाठविण्यात आला आहे.

रक्षाबंधन आणि दिवाळीनिमित्त शहरातील कुटुंबीयांकडून राखी आणि दिवाळीचा फराळ पाठविला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने अनेक देशांकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागाची पार्सल सेवाही बंद झाली होती. रक्षाबंधनला परदेशात राहणाऱ्या भावापर्यंत बहिणीची राखी पोहोचली नाही. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. टपाल विभागानेही पार्सल पाठविण्याची सुविधा पूर्ववत सुरु केली. परदेशात राहणाऱ्या शहरातील नागरिकांपर्यंत दिवाळी फराळ पाठविणे त्यामुळे शक्य झाले. गेल्या १० ते १२ दिवसांपासून शहरातील जीपीओ टपाल कार्यालयाने दिवाळी फराळचे पार्सल पाठविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. या दिवसांत सुमारे शंभरहून अधिक पार्सल बुक झाली आहेत.

----

या देशात अधिक पार्सल

टपाल विभागाने आतापर्यंत शंभरहून अधिक देशांत पार्सल पाठवली असून, यामध्ये लंडन व अमेरिकेसाठी सर्वाधिक फराळाची पार्सल बुक झाली. टपाल विभागाने पार्सल सेवा उपलब्ध करून दिली असली, तरी प्रत्येक पार्सलची तपासणी केली जात आहे. पार्सल पाठविणाऱ्या नागरिकांना किमान ८०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत हे दर वजन आणि अंतरानुसार ठरविले जात आहेत. ३५ किलोपर्यंत फराळ पाठवता येऊ शकतो. यासाठी अधिक पैसे माेजावे लागत असले तरी फराळ पाठविणारे नागरिक समाधानी आहेत.

---

सोलापूर डाक विभागाने १०२ देशांत दीपावली फराळ पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे. सध्या अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर याठिकाणी फराळ पाठवला जात आहे. आत्तापर्यंत १०० देशांत पोस्टाद्वारे फराळ पाठविण्यात आलेला आहे. आमचे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये औषधे, पैसे आणि आता दिवाळी फराळ पोहोचविण्याचे काम उत्तमरित्या करत आहेत.

- श्री. ए. वेंकटेश्वर रेड्डी, प्रवर अधीक्षक, डाकघर, सोलापूर

--

Web Title: Faral from Solapur goes by post to USA, London, Singapore and Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.