आबासाहेबांना निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:45+5:302021-08-01T04:21:45+5:30

अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली. फुलांची उधळण करण्यात आली. गणपतरावांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या जनतेने धाय मोकलून रडत आपल्या भावनांना ...

Farewell to Abasaheb! | आबासाहेबांना निरोप!

आबासाहेबांना निरोप!

Next

अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली. फुलांची उधळण करण्यात आली. गणपतरावांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या जनतेने धाय मोकलून रडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. शनिवारी सोलापूर येथून सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव पेनूर गावात आणण्यात आले. तेथे काहीवेळ गावकऱ्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवून नंतर सांगोल्यात आणण्यात आले. पंढरपूर ते सांगोला रस्त्यावरील गावोगावी त्यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांचे पार्थिव आणले. तेथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कचेरी रोड, जयभवानी चौक, नेहरू चौक, स्टेशन रोडमार्गे देशमुख यांच्या निवासस्थानी ही अंत्ययात्रा पोहोचली. तेथेही काहीकाळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथून महात्मा फुले चौक, मिरज रोड मार्गे अंत्ययात्रा सांगोला शेतकरी सूतगिरणीच्या प्रांगणात पोहोचताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांसह सांगोल्यासह जिल्ह्यातून आलेल्या जनतेने शेवटचे अंत्यदर्शन घेतले. अनेकांना यावेळी अश्रू आवरता आले नाहीत.

दुपारी तीनच्या सुमारास मानवंदना देऊन हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यांच्या पार्थिवाला ज्येष्ठ चिरंजीव पोपटराव देशमुख यांनी

मुखाग्नी देऊन पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

-----

यांनी वाहिली श्रद्धांजली

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जयंत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, बबनराव शिंदे, समाधान अवताडे, प्रशांत परिचारक, सुमन पाटील, अनिल बाबर या आमदारांसह माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री व आमदार महादेव जानकर, माजी मंत्री राम शिंदे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार रामहरी रूपनर, नगराध्यक्षा राणी माने यांच्यासह गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, पुत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, मुलगी शोभा, नातू डॉ. अनिकेत, डाॅ. बाबासाहेब व देशमुख परिवारातील सदस्य, उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार नारायण पाटील, वैभव नायकवडी, माऊली हळणवर, जगदीश बाबर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, महसूलचे तहसीलदार श्रीकांत पाटील, रफिक नदाफ, तानाजी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, प्रभाकर माळी, बाबूराव गायकवाड, पी. डी. जाधव, गिरीश गंगथंडे, अतुल पवार, राणी कोळवले, स्वाती मगर, अनिल (बंडू) केदार, प्रा. नानासाहेब लिगाडे, शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह हजोरो नागिरकांनी श्रद्धांजली वाहिली

----

बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना

आबासाहेबांचे पार्थिव तालुक्‍यात येण्याअगोदरच सांगोला शहर व तालुक्‍यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर सर्वत्र रांगोळी व फुलांची उधळण करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. आबासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या अगोदर पार्थिवावर लपटलेला तिरंगा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पत्नी रतनबाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

अश्रूंना वाट मोकळी

गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगोला तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. गावागावांतील शोकाकुल कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी धावले. अनेकांनी हंबरडा फोडला. लाडक्या नेत्याचे दर्शन आता पुन्हा होणार नाही या दु:खावेगाने त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली

----

गणपतरावांच्या निधनानंतर विधानसभा पोरकी झाली. बहुजन, गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी लढा देणारे नेतृत्व हरपले. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर दुष्काळी जनतेसाठी ऐतिहासिक कामगिरी केल्याने राज्य सरकारने त्यांच्या नावाने दुष्काळी भागासाठी योजना राबवावी.

- जयंत पाटील, आमदार, शेकाप राज्य चिटणीस

------

आबासाहेबांच्या निधनाने कष्टकरी, शेतकऱ्यांचा आवाज नि:शब्द झाला. त्यांच्या निधनाने राज्यासह सोलापूर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे. आबांनी दुष्काळी भागासाठी केलेल्या कामाची नोंद घेण्यासाठी शासनाच्या वतीने दुष्काळी भागासाठी योजना सुरू करणार असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.

- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

Web Title: Farewell to Abasaheb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.