वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न
By विलास जळकोटकर | Published: June 12, 2023 05:18 PM2023-06-12T17:18:54+5:302023-06-12T17:19:44+5:30
शेतकरी धर्मराज काशीद यांची सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील केमवाडी (ता. तुळजापूर) येथे शेती आहे.
सोलापूर : गावोगावी वारंवार लाईट गुल होत असल्यानं पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातूनच एका शेतकऱ्यानं शेतातली पपई सुकू लागल्यानं चक्क स्टीकर नावाचं कीटकनाशक प्राशन केलं. त्यांना त्रास होऊ लागल्यानं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. धर्मराज शत्रू्घ्न काशीद (वय- ५२, रा. केमवाडी, ता. तुळज़ापूर असं शेतकऱ्याचं नाव आहे. रविवारी रात्री ११:३० वाजता स्वत:च्या शेतात ही घटना घडली.
यातील शेतकरी धर्मराज काशीद यांची सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील केमवाडी (ता. तुळजापूर) येथे शेती आहे. पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी पपईचं पीक घेतलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून वीज पुरवठा केली जाणारी लाईट वारंवार सूल लागल्यानं ते अडचणीत आले होते. यामुळे जीवापाड जपलेली पपई डोळ्यासमोर सुकू लागली. यामुळे निराशेतून रागाच्या भरामध्ये त्यांनी रविवारी रात्री ११:३० च्या सुमारास स्वत:च्या शेतामध्येच पिकांवर फवारण्यासाठीचे कीटकनाशक प्राशन केले. यामुळे त्यांना त्रास होऊ लागला.
नातलगांनी तातडीने जवळच असलेल्या वडाळा येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये भाऊ अर्जुन याने हलवले. त्याच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.