शेवरेत शेतकर्याचा वीज पडून मृत्यू
By admin | Published: June 3, 2014 12:53 AM2014-06-03T00:53:11+5:302014-06-03T00:53:11+5:30
वादळवारा: अनेक घरांवरील पत्रे उडाले
टेंभुर्णी : टेंभुर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावरील शेवरे गावच्या हद्दीत कुरणवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या तुकाराम रामचंद्र मस्के (वय ३५) यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला.ही घटना सोमवार दि. २ जून रोजी दुपारी ४.३० वाजता घडली. टेंभुर्णी परिसरात सोमवारी दुपारी जोरदार वादळ व विजांचा कडकडाट झाला. याच वेळी शेवरे येथील तुकाराम रामचंद्र मस्के हे शेतात वैरण काढण्यासाठी गेले होते. याच दरम्यान वादळ थांबल्यावर गणेश मस्के हा शेतात गेला तेव्हा आंब्याच्या झाडाखाली तुकाराम मस्के हे जमिनीवर पडलेले आढळून आले. जवळ जाऊन पाहिले तेव्हा मस्के यांचे शर्ट व बनियन जळाल्याचे दिसले. त्यांची हालचालही थांबली होती. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मृताच्या कुटुंबीयास शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, असे तहसीलदार शेंडगे यांनी सांगितले. दुपारी चार वाजता या भागात झालेल्या वादळामुळे चव्हाणवाडी येथील काझी वस्तीवरील चाँद काझी, शकील काझी, अल्ताफ काझी यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच वेणेगाव येथील रोडच्या बाजूला असलेल्या टपर्यांवरील पत्रेही उडून गेले. यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती.