पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:23 IST2025-03-23T19:23:09+5:302025-03-23T19:23:34+5:30
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला
Solapur Farmer Murder: शेती वहिवाटण्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याचा निघृण खून केल्याची घटना शुक्रवारी दि. २२ मार्च रोजी माढा तालुक्यातील बुद्रूकवाडी येथे घडली. कांतीलाल ज्ञानदेव माने (५२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मयताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने (वय ३२, रा. बुद्रूकवाडी ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिवा संपत्ती बुद्रूक (रा. बुद्रूकवाडी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दि २२ रोजी ६.३० वाचे दरम्यान फिर्यादीचे पती मयत कांतीलाल माने गावातील संदीप पाटील यांची शेती करतात. याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादीचे पती कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची फिर्याद माढा पोलिसात दिली.
या घटनेनंतर आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल व सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर माढा पोलिस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते.
तीन तास कुटुंबियांचा ठिय्या
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांकडून आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी माढा पोलीस स्टेशन समोर ३ तास हून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी संशयित आरोपीची पत्नी व इतर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून आंदोलन मागे घेत प्रेत ताब्यात घेण्यात आले.