तुरीचा तोरा तीन हजाराने घसरला, शेतमालांची अशी अवस्था : शेतकऱ्यांचे पुरते हाल
By काशिनाथ वाघमारे | Published: January 8, 2024 07:36 PM2024-01-08T19:36:35+5:302024-01-08T19:36:44+5:30
शेतीमालाची ही कधी नव्हे त्या अवस्थेने राज्यातील शेतकऱ्यांचे पुरते हाल सुरू आहेत.
सोलापूर : निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर जमिनीवर आले, १० महिन्यांपासून दूध खरेदी दर घसरल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ आली, तेल आयातीमुळे सोयाबीन बाजार चार हजारांवर आला, इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने ऊस उत्पादकांचे अवसान गळाले, इतर शेती उत्पादनाचे बाजारात हाल सुरू असताना ११ हजारांचा टप्पा पार केलेल्या तुरीचा तोरा आठ हजारांपर्यंत खाली आला. शेतीमालाची ही कधी नव्हे त्या अवस्थेने राज्यातील शेतकऱ्यांचे पुरते हाल सुरू आहेत.
दोन- तीन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण शेती आतबट्ट्याची ठरली होती. २०२३ या वर्षात शेतीमालाची अवस्था दयनीय झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात खासगी दूध संघांनी इशारा देत दूध खरेदी दरात कपात करण्यास सुरुवात केली. गाय दूध खरेदी ४० रुपयांवर गेलेला दर २५ रुपयांवर आला. मागील १० महिन्यापासून दूध व्यवसाय तोट्यात केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर क्विंटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता. आता तोच दर तीन हजारांहून अधिक कमी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे तुरीचे भाव
बाजार समिती आजचा भाव
अक्कलकोट ८१००- ९१००
सोलापूर ८१०० ९२००
बार्शी ८०००- ९०००
वैराग ७८००- ८५००
दुधनी ८५०० -९१००
शेतक-यांचा शेतीमाल विक्रीला बाजारात येण्यास सुरुवात झाला की खरेदी दर कमी होण्यास सुरुवात होते. गेली वर्षभर ऊस, सोयाबीन, कांदा व दूध उत्पादक शेतकरी दराच्या घसरणीमुळे अडचणीत आले आहेत. आता तुरीच्या दरात तीन ते साडेतीन हजार रुपयाने घसरण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
- सुहास पाटील
रयत क्रांती संघटना