तेल्याने उद्ध्वस्त झालेल्या पाच एकर डाळिंबावर शेतकºयाने फिरविला रोटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:28 PM2020-08-26T12:28:46+5:302020-08-26T12:28:54+5:30
सततच्या रोगांमुळे शेतकरी बागा काढण्याच्या मानसिकतेत
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून डाळिंबावर तेल्या, डांबºया, कुजवा रोगांमुळे बागा उद्ध्वस्त होत आहेत. द्राक्ष बागांचीही हीच अवस्था आहे. महागडी औषधे फवारूनही बागा वाचविण्यात अयशस्वी ठरत असलेल्या त्रस्त शेतकºयांकडून उभ्या बागांवर रोटर फिरवून बागा नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेकडो शेतकºयांच्या बागा विविध रोगांनी उद्ध्वस्त होत असल्या तरी याबाबत राजकीय व प्रशासकीय उदासीनता दिसत असल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
पंढरपूर तालुक्यात उसाबरोबरच कमी पाण्यावर येणारी पिके म्हणून तालुक्यातील शेतकरी आता डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, पेरू आदी फळबागा लागवडीकडे वळल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. तालुक्यातील करकंब, खर्डी, पटवर्धन कुरोली, शेवते, भाळवणी, जैनवाडी, भंडीशेगाव, वाखरी, सरकोली, चळे, तुंगत रोपळे, मेंढापूर, सुपली, पळशी, उपरी, कासेगाव, कोर्टी, बोहाळी आदी परिसरात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. उन्हाळ्यात शेतकºयांनी थेंब थेंब पाण्यावर शेकडो हेक्टर बागा कोविड-१९ च्या प्रादुर्भावाशी दोन हात करत जगविल्या. मात्र या फळबागा काढणीच्या कालावधीत या बागांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला.
डाळिंबावर तेल्या, डांबºया, कुजवा, पाकळी कुजवा आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे डाळिंबाच्या उभ्या बागा फळांसह वाळून गेल्या. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय द्राक्ष बागेलाही या रोगाने सोडले नसून द्राक्षावर दावण्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले होते. त्यानंतर हातातोंडाला आलेल्या बागा जगविण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांची महागडी औषधे फवारून बागा जगविण्याची शेतकºयांची धडपड सुरू होती. मात्र निसर्गापुढे शेतकरीही हतबल झाले आहेत. शेकडो हेक्टर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. द्राक्षांची अवस्था यापेक्षा नवीन नसल्याचे चित्र आहे.
औषधे फवारूनही बागा हाती लागत नसल्याचे लक्षात येताच शेतकºयांनी उभ्या बागा रोटरच्या साह्याने जमिनीत गाडण्यास सुरुवात केली आहे. किमान इतर पिके तरी त्या ठिकाणी लावून काहीतरी उत्पन्न हाती लागेल या मानसिकतेत सध्या तालुक्यातील शेतकरी आहेत.