शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढले, शरद पवार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:06 AM2018-03-31T11:06:47+5:302018-03-31T11:06:47+5:30
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शतक महोत्सवी सभारंभ सोलापुरातील पार्क मैदानावर झाला.
सोलापूर : राज्यात कर्जबाजारी शेतकºयांचे प्रमाण वाढत आहे़ २०१४ ते २०१७ या कालावधीत राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्याने वाढले, या कालावधीत ७ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. घेतलेले कर्ज फिटले नाही, मालाला भाव मिळाला नाही, वसुलीची नोटीस आल्याने शेतकºयांनी आत्महत्या केल्या. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ७१ हजार कोटींची कर्जमाफी शेतकºयांना दिली होती. गहू, तांदूळ व अन्य शेतीमालाची निर्यात वाढली होती अशी माहिती माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिली़
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शतक महोत्सवी सभारंभ सोलापुरातील पार्क मैदानावर झाला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभाताई बनशेट्टी, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. प्रशांत परिचारक, आ. रामहरी रुपनवर, राज्य बँकेचे प्रशासकीय मंडळ अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेवे, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव जगताप आदी उपस्थित होते. शेतीमालाला चांगल्या उत्पादनावर आधारित दर दिला पाहिजे, शेतकरी कर्जदारावर व्याजाचा अधिक बोजा पडणार नाही असा व्याजाचा दर असला पाहिजे असे खा. पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, दुष्काळ, गारपीट व रोगराईमुळे शेतीपिकांचे नुकसान होते. यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उत्पन्नावर दीडपट दर व अशावेळी बँकेने जबाबदारी घ्यावी असे दोन कायदे करावेत असा निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी दोन-तीन वर्षांत बँक स्थिरावत असल्याचे सांगून संचालक मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमाला माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. दिलीप माने, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. धनाजी साठे, जि.प. सदस्य विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, जकरायाचे अध्यक्ष अॅड. जाधव, जि.प. विरोधी पक्षनेते बळीराम साठे, कल्याणराव काळे, प्रकाश चवरे, मानाजी माने, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.