शेतकऱ्यांकडून जागा पकडण्यास सुरुवात,काटेरी झुडपे काढली; जनावरांचा बाजार
By शीतलकुमार कांबळे | Published: January 7, 2024 02:35 PM2024-01-07T14:35:10+5:302024-01-07T14:35:50+5:30
शनिवारी रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मैदानात स्वच्छता करण्यास सुरुवात झाली
सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरणार आहे. यासाठी शेतकरी व पशुपालकांकडून जागा पकडण्यास सुरुवात झाली आहे.
मागील तीन वर्ष जनावरांचा बाजार भरला नव्हता. दोन वर्ष कोरोना तर एक वर्ष लंपीमुळे बाजार भरवणे शक्य झाले नव्हते. यावर्षी तरी जनावरांचा बाजार भरेल का अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतर जनावरांचा बाजार भरण्यास मान्यता देण्यात आली. यानंतर मंदिर समितीकडून बाजार भरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
शनिवारी रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मैदानात स्वच्छता करण्यास सुरुवात झाली. मागील तीन वर्षे बाजार न भरल्यामुळे अनेक ठिकाणी काटेरी झुडपे आली होती. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने ही काटे झुडपे काढावी लागली. रविवारपर्यंत बहुतांश ठिकाणाची काटारी जोडपे काढण्यात आली. आपली जनावरे घेऊन जाण्या आधी बाजारामध्ये जागा पकडण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकरी आपली जनावर विकण्यासाठी जागा पकडून तिथे रेषा मारून व आपले नाव लिहीत आहेत.
मंगळवारी भरेल बाजार
जानेवारी महिना येण्याच्या आधीपासूनच दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरत असतो. यावर्षी बाजार भरेल की नाही याबाबत स्पष्टता नसल्यामुळे मंगळवारी बाजार भरला नव्हता. आता मंदिर समितीकडून बाजार भरवण्यासाठीची तयारी करण्यात येत आहे. यामुळे मंगळवार 9 जानेवारीपासून बाजार भरेल. तर बारा ते 12 जानेवारी पासून पूर्ण क्षमतेने बाजार भरेल. जिल्हाभरातून शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन सहभाग घेतील अशी अपेक्षा मंदिर समितीतर्फे व्यक्त करण्यात आली.