शेतकऱ्याकडे 3 हजारांची लाच मागितली, तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 06:11 PM2019-07-24T18:11:46+5:302019-07-24T18:15:14+5:30
शेतकरी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सोलापूर - शेतकऱ्याकडून 3 हजार रुपयांची लाच घेताना, लाललुचपत प्रतिबंधक विभागाने गाव कामगार तलाठ्यास रंगेहात पडकले. त्यानंतर, तलाठ्यास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या वैराग तालुक्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फेरफार नोंद करण्यासाठी या तलाठ्याने शेतकऱ्याकडे 3 हजारांचा लाच मागितली होती. अस्लम सरदार मलिक शेख असे या तलाठ्याचे नाव असून ते बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे.
शेतकरी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने 11 गुंठे शेतजमिनीचा व्यवहार केला होता. या व्यवहारानानंतर 7/12 उताऱ्यावर नाव लिहून देण्यासाठी तलाठ्याने शेतकऱ्याकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत जागृत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर, आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने वैरागमध्ये सापळा रचून तलाठ्यास अटक घेताना रंगेहात अटक केली. अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे आणि पुणे विभागाचे दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे, सहा पोलीस उपअधिक्षक निलकंठ जाधवर, पोलीस हवालदार प्रफुल्ल जानराव, उमेश पवार, श्याम सुरवसे यांच्याकडून करण्यात आली.
दरम्यान, अँटी करप्शन विभागकडून नागरिकांना लाच न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार सोलापूर अँटी करप्शन ब्युरो दूरध्वनी क्रमांक 0217-2312668 कडे करण्याचे सूचवले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 ही देण्यात आला आहे.