शेतकºयांची दिवाळी अंधारातच; पंचनामे पूर्ण व्हायला आणखी दहा दिवस लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:09 PM2020-10-21T12:09:02+5:302020-10-21T12:10:50+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती : अद्याप १० टक्केच पंचनामे पूर्ण
सोलापूर : अतिवृष्टीमुळे शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरलंय. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुराचे पाणी आता हळूहळू ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त दहा टक्केच पंचनामे झाले आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.
कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्या संयुक्त पथकाद्वारे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सुरुवातीला बहुतांश गावांमध्ये पुराचे पाणी तीन ते पाच फुटांपर्यंत असल्याने पंचनामे करताना अनेक अडथळे आलेत. मागील दोन दिवसात पुराचे पाणी ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करायला सुरुवात झाली असून यात शेती पिकांचे नुकसान, मृत्युमुखी पडलेले जनावरे, घरांची पडझड, स्थलांतरित नागरिक यांसह इतर अनेक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आली.
अतिवृष्टीमुळे जवळपास साडेआठशेहून अधिक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले. बत्तीस हजारांहून अधिक नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना, खासगी इमारती तसेच मठांमध्ये आश्रय घ्यावा लागला. २२०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, साडेआठ हजार मोठी आणि छोटी जनावरे दगावली आहेत. सोळा लोक मृत्युमुखी पडले आहेत. जवळपास दीड लाख खरीप पीक क्षेत्र यातून बाधित झाले आहे, अशी नुकसानीची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे.
जिल्हा प्रशासन अद्यापही सतर्क
वेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीपात्राशेजारील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. स्थलांतरित बहुतांश नागरिकांना अद्याप निवारा केंद्र न सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात झाल्यास नदीशेजारील सर्व नागरिकांना तत्काळ स्थलांतरित होण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफच्या दहा पथकांना तालुक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.