मका, कांदा, उडीद, तूर लागवडीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:21+5:302021-06-10T04:16:21+5:30
यंदा तालुक्यात १० हजार ५३४ हेक्टरवर खरिपाची पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी ...
यंदा तालुक्यात १० हजार ५३४ हेक्टरवर खरिपाची पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोफत बियाणे मिळणार आहे.
तत्पूर्वी खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेताची मशागत सुरू केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभागही धावला असून, सल्ला, मार्गदर्शन, जागेवर बियाणे पुरवठा, खते, विविध योजनांमधून बियाणे, शेती अवजारे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भीमा (चंद्रभागा), माण नदीकाठ, उजनी डावा व उजवा कालवा भागात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे, तर निरा उजवा कालवा भागात फळबांगांबरोबर मका, बाजारी, ज्वारी, कांदा, उदीड, तूर, आदी पारंपरिक खरिपांची पिके घेतली जात आहेत.
पंढरपूर तालुक्यात दक्षिण व पश्चिम भागातील निरा उजवा व उजनीच्या कालव्यातून शेतीला पाणी मिळत असल्याने सिंचनाची सोय झाली आहे. यामुळे डाळिंब, द्राक्ष, पेरू, बोर, अॅप्पल बोर, सीताफळ, चिकू, शेवगा, आंबा, आदी फळबांगांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे, तर खरीप पिकांची पेरणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मका, तूर, बाजरी, हरभरा, कांदा, उडीद ही पिके शेतकरी घेतात. आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी व माहिती घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर भेटी देत आहेत.
ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना मोफत बियाणे
खरीप हंगामासाठी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बियाणे, रोपे देण्याची तयारी सुरू आहे. खरीप हंगामात मका ४३९० हेक्टर, बाजरी १९५, तूर १७७, मूग ६४, उडीद १४२, भुईमूग १६०, सोयाबीन ११४, तर ऊस ५२८२ हेक्टर क्षेत्र आहे. तालुका कृषी विभागाने पीक प्रात्याक्षिकांतर्गत तुरीचे ४ प्रकल्प, उडीदाचे दोन, तर बाजरीचे २० प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांनाच बियाणे मोफत मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार यांनी दिली.
फोटो ::::::::::::::::::::::::::::::::::
खरीप हंगामासाठी शेतकरी बी-बियाणे, खते, खरेदीसाठी पंढरपूर शहरातील कृषी केंद्रावर अशी गर्दी करीत आहेत.
(फोटो : मोहन डावरे)