‘भूमी अभिलेख’च्या मनमानीविरुद्ध शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:45+5:302020-12-05T04:47:45+5:30
माळशिरस : गेल्या काही महिन्यांपासून वारंवार चर्चेत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर मनमानी कारभाराचा निषेध करीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू ...
माळशिरस : गेल्या काही महिन्यांपासून वारंवार चर्चेत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर मनमानी कारभाराचा निषेध करीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जमिनी संदर्भातील कागदपत्रासाठी संबंधित शेतकऱ्यांना टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पळसमंडळ (ता. माळशिरस) येथील पाच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले.
जमिनीसंदर्भात वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी अनेक नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी सुरू असतानाच पळसमंडळ येथील गट नंबर ३२२ संदर्भात मोजणी प्रक्रियेनंतर हद्दी, खुणा दाखवल्या होत्या; मात्र याबाबतीतील नकाशा व कागदपत्रांसाठी अर्ज दिला असता भूमी अभिलेखमधील अधिकारी वारंवार वेगवेगळ्या अडचणी सांगून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे दत्तू साळवे, भारत साळवे, अशोक साळवे, महादेव साळवे, बाळू साळवे या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत अधिकाऱ्यांनी बेफिकिरी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
कोट :::::::::::::
संबंधित शेतकऱ्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी वेळ लागत असून याबाबतचे कागदपत्र ८ डिसेंबर रोजी देणार आहोत. याबाबत लेखी पत्र आम्ही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना देणार आहोत.
- आर. आर. तळपे
उपअधीक्षक भूमी अभिलेख, माळशिरस
फोटो
माळशिरस येथील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले शेतकरी.