अक्कलकोट, दक्षिणमधील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; जाणून घ्या नेमकं कारण?
By Appasaheb.patil | Published: February 28, 2023 03:45 PM2023-02-28T15:45:20+5:302023-02-28T15:46:21+5:30
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.
सोलापूर : बहुचर्चित चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला देणाऱ्या नोटीसा आल्या आहेत, मात्र तो दर अतिशय अत्यल्प असून तो वाढवून मिळावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मागणी केली.
नुकतीच अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत गडकरी यांनी जिल्हाधिकारी यांना भेटा व आपली मागणी मान्य करून घ्या असे सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्या भागात झालेल्या खरेदी विक्रीचे पुरावे द्या त्यानुसार दर देऊ असे आश्वासन दिले. दरम्यान माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी अपेक्षित दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत सोमवारी रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले.
अक्कलकोट-नळदुर्ग हायवेच्या प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, रिंग रोड संदर्भात शेत जमिनीला प्रति गुंठा तीन ते पाच लाख रुपये दर मिळावा अशी मागणी संघर्ष समितीने केली. यावेळी संघर्ष समिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सभापती गोकुळ शिंदे, दिलीप जोशी, स्वामीनाथ हरवाळकर, महेश भोज, अमोल वेदपाठक, गोविंद वेदपाठक, भिवाजी शिंदे, विकी गाढवे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.