कारकलच्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीला नवा पर्याय देत शतावरीपासून मिळवले एकरी ९ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:28 PM2018-11-27T12:28:28+5:302018-11-27T12:29:41+5:30
यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे.
- नारायण चव्हाण (सोलापूर)
पारंपरिक शेतीला छेद देऊन कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी शतावरी या औषधी वनस्पतीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यातून मोठा आर्थिक लाभ झाला आणि उसाच्या शेतीला नवा पर्याय शतावरीमुळे निर्माण झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या परिसरात ऊस आणि केळीच्या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. नद्यांना पाणी सोडले नाही, तर या नगदी पिकांचे मोठे नुकसान होते. तसेच वषार्नुवर्षे ऊस या एकाच पिकाची लागवड केल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. त्यात ऊस उत्पादनातून मिळणारी रक्कम ही अत्यंत तोकडी असते. अशा स्थितीत उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ही औषधी वनस्पती नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.
पुणे येथील एका कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सोमनाथ छपरे यांनी कारकलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मल्लिकार्जुन गवसणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्सुकतेपोटी शतावरीच्या शेतीची माहिती मिळवली. त्यातून नवा प्रयोग म्हणून शतावरीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. मल्लिकार्जुन गवसणे, अनिल बिराजदार, गुंडेराव कुलकर्णी, राजशेखर बोराळे, सोमनाथ बिराजदार या पाच शेतकऱ्यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी करार केला.
उत्तम निचऱ्याची, डोंगराळ, मुरमाड, रेताड, उजाड माळरान अशा जमिनीत शतावरीचे पीक जोमदार येते. पाणी साठवणारी, खोलगट, पाणथळ आणि चुनखडीची जमीन शतावरीसाठी उपयुक्त ठरत नाही. हवामानाच्या दृष्टीने ही समशीतोष्ण, उष्ण आणि दुष्काळी भागात शतावरीच्या पिकाची चांगली वाढ होते. कमी पाण्यात येणारे शतावरी पीक आहे. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आठवड्यातून एकदा पाणी दिले. जास्तीचे पाणी या पिकाला मारक ठरते. कंपनीने कारकल येथील लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या कंपनीसोबत उत्पादन प्रति किलो ५० रुपये दराने विकत घेण्याचा करार केला होता. त्यांना रोपे पुरविली. १५ महिन्यांनंतर शतावरीची जेसीबीच्या साह्याने काढणी करण्यात आली. रोपागणिक सरासरी १५ ते १७ किलो वजनाची शतावरीची मुळी झाली. एका एकरात १८ मे टन शतावरीचे उत्पादन झाले.
कंपनीने करारानुसार वाहतूक खर्च सोसून ही शतावरीची मुळी विकत घेतली. त्यातून शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता एकरी ७ लाख रुपये त्यांच्या हाती पडले. अन्य कोणत्याही पिकापेक्षा हे उत्पादन निश्चितच अधिक मिळाले. त्यामुळे ही शेती पारंपरिक शेतीला छेद देणारी ठरली आहे. इतर पिकांच्या तुलनेत शतावरीने आम्हाला खुप उत्पन्न मिळवून दिले. यामुळे आमचा विश्वास बळावला असल्याचे उत्पादक मल्लिकार्जुन गवसणे म्हणाले.