एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी संघटना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:34+5:302020-12-31T04:22:34+5:30
सोलापूर : जाहीर केलेल्या एफआरपीची रक्कम एकाच हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात ...
सोलापूर : जाहीर केलेल्या एफआरपीची रक्कम एकाच हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटना कारखानदारांच्या भेटीगाठी घेऊन मागणी रेटत आहे, मात्र साखर कारखानदार अडचणींचा पाढा वाचत दोन हप्त्यांत ही रक्कम अदा करण्याच्या विचारात आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांनी मंगळवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेतली. दोन महिने उलटूनही ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. याकडे त्यांचे लक्ष वेधले. ही एफआरपीची रक्कम तुकड्या-तुकड्याने देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी संघटनेने केली. जानेवारीत रकमा जमा करण्याची तयारी काडादी यांनी दर्शविली. कार्यकारी संचालक समीर सलगर यांच्याशीही संघटनेने चर्चा केली.
संघटना याबाबत आग्रही असून, अन्य कारखानदारांच्या भेटी घेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एक रकमी एफआरपी देण्याबाबत कारखान्यांना सक्ती करावी, अशी मागणी करणार असल्याचे महामूद पटेल यांनी सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे उपाध्यक्ष विजय रणदिवे, सचिव उमाशंकर पाटील, रजाक मकानदार, हमीद पटेल यांचा समावेश होता.
------
शेतकरी सध्या अडचणीत आहेत. ऊस बिलाच्या रकमेवर त्यांचे वर्षभराचे नियोजन आणि खर्च अवलंबून असतो. हप्त्याने रकमा दिल्यास त्यांचे गणित बिघडून जाते. एकरकमी मिळाले तरच योग्य विनियोग करणे शक्य असते.
- महामूद पटेल
- जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर
----------
फोटो - ३० सिद्धेश्वर कारखाना
सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल व अन्य पदाधिकारी.