बँकांना कारवाईच्या धमक्या देऊन शेतकऱ्यांची चेष्टा : राजन पाटील यांची भाजप सरकारवर टिका
By admin | Published: June 24, 2017 12:25 PM2017-06-24T12:25:19+5:302017-06-24T12:25:19+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : बँकांची आर्थिक अडचण न पाहताच सत्ताधाऱ्यांकडून पीक कर्ज देण्याच्या मुद्यावरुन सातत्याने कारवाईच्या धमक्या देत असून, त्यांना शेतकऱ्यांना कर्जाच्या माध्यमातून मदत मिळावी असे वाटत नाही असा आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केला आहे.
राज्यात सध्या पीककर्ज माफीचा विषय ऐरणीवर असून जाहीर केलेल्या कर्जमाफीवरुन वादंग सुरू असतानाच नव्याने कर्ज वाटपाचाही मुद्दा सतत चर्चेत आहे. शासन सरसकट कर्जमाफी करणार की लाखापर्यंतचे?, किंवा अन्य निकष लावणार?, हे आजही नक्की नाही. अशातच कर्जमाफी होणाऱ्या किंवा सध्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने १० हजार रुपयांप्रमाणे कर्ज देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत; मात्र सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसेच नसल्याने नव्याने कर्ज न देण्यावर बँक ठाम आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे रोखता व तरलता(सी.आर. आर. व एस.एल. आर.) राखण्यासाठी आम्हालाच पैशाची गरज असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. शासनस्तरावरुन पीक कर्जाबाबत दररोज वेगवेगळे आदेश निघत असून, नियम व निकषामुळे कर्ज कोणाला द्यायचे हा बँकांपुढील प्रश्न असल्याचे पाटील म्हणाले. महसूलमंत्र्यांनी आता राज्य बँकेची मदत घ्यावी असे म्हटले आहे, आम्ही ५० कोटींची मागणी केली असून ती मिळेल का नाही?, कधी मिळणार?, हे माहिती नाही; मात्र शासनाचे सध्याचे धोरण पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे असे शासनालाच वाटत नाही असा आरोप पाटील यांनी केला.
------------------------
राज्य बँकेतील ठेवीतून पैसे द्या
एस.एल.आर. राखण्यासाठी जिल्हा बँकेला ३८७ कोटी २३ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक असून बँकेने आतापर्यंत २५१ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेकडे पैसे नसल्याने १३५ कोटी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली नाही.
- १३५ कोटी ७५ लाख रुपयावर बँकेला १४.५ टक्के व्याज भरावे लागते आहे.
सी.आर.आर. राखण्यासाठी ७५ कोटी ५६ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक असताना बँकेने १४६ कोटी २६ लाख गुंतविले आहेत. सी.आर.आर. मध्ये अधिक ६८ कोटींची गुंतवणूक आहे.
- राज्य बँकेत आमच्या ३५० कोटींच्या ठेवी असून यापैकी काही रक्कम परत मिळाली तर ही रक्कम एस.एल.आर.मध्ये गुंतवून व्याज वाचवू.
- रद्द झालेल्या १०२ कोटींच्या नोटा आठ महिने न स्वीकारल्याने बँकेचे नुकसान झाले. खातेदाराला चार टक्के व्याज द्यावे लागले तर ही रक्कम शेतकऱ्यांना वाटता न आल्याने व्याजावर पाणी सोडावे लागले.
----------------
रद्द केलेल्या नोटा स्वीकारत नाहीत, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पैसे देत नाहीत, दुष्काळी मदतही दीड वर्षापासून दिली नाही. ही परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होईल यावर विश्वास नाही.
- राजन पाटील
अध्यक्ष, जिल्हा बँक