करमाळ्यात उडीद बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:19+5:302021-06-10T04:16:19+5:30
उडीद बियाणे टंचाईमुळे खरेदीसाठी शेजारच्या जामखेड, पाटोदा, कडा, आष्टी, परंडा भागातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. करमाळा तालुक्यात खरीप हंगामाची ...
उडीद बियाणे टंचाईमुळे खरेदीसाठी शेजारच्या जामखेड, पाटोदा, कडा, आष्टी, परंडा भागातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
करमाळा तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी खरीप पेरण्यासाठी बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू लागला आहे. गतवर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी उडीदाची तालुक्यात १६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी केली. वेळेवर पडलेल्या पावसामुळे उडीदाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले व बाजारात ५ ते ७ हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. कमी पाऊस व अवघ्या ७० दिवसात हाती उत्पन्न देणारे पीक म्हणून उडीदास शेतकरी पसंती देत आहे. यंदा सुद्धा शेतकऱ्यांचा उडीद पेरण्याकडे कल दिसून येत आहे. बियाणे बाजारात निर्मल उडीद बियाण्यांच्या पिशवीला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी होत आहे.
------
चार दिवसात १०५ टन उडीद बियाणे विक्री..
करमाळा तालुक्यापेक्षा जास्त पाऊस शेजारच्या तालुक्यात झाल्याने उडीद पिशवी खरेदीसाठी जामखेड, पाटोदा, आष्टी,परंडा या भागातील शेतकरी करमाळ्यात येऊन उडीद खरेदी करू लागले आहेत. तालुक्यातील १८० बियाणे दुकानातून गेल्या चार दिवसात तब्बल १०५ टन उडीद बियाण्याची विक्री झाली आहे.
----
शेतकऱ्यांनी एकदम पाच सहा एकरात एकाच उडीद वाणाची पेरणी न करता विभागणी करून मका, सुर्यफूल बियाण्यांची पेरणी करावी. उडीद पिकावर सलग चार-पाच दिवस दमदार पाऊस पडला तर पीक वाया जाण्याची भीती असते.
- निलेश चव्हाण, विक्रेते
--