उजनीच्या पाण्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेततळी हसू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:08 PM2018-08-30T13:08:54+5:302018-08-30T13:10:47+5:30
शेतकºयांना मिळाला दिलासा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानाचे फलित
दत्तात्रय शिंदे
वडाळा : उजनी धरणात अतिरिक्त झालेले पाणी शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडले आहे़ या आलेल्या पाण्यातून वडाळा परिसरात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यात पाणी सोडल्यामुळे व परिसरात पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे या भागातील शेततळी पाण्याने तुडुंब भरली असून, ती दिमाखात हसू लागल्याचे चित्र शेतकºयांना पाहावयास मिळत आहे़ याचबरोबर पाझर तलाव, विहिरींना पाणी वाढले आहे़
उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून, अतिरिक्त झालेले पाणी, सीना नदीद्वारे येणारे पाणी उत्तर सोलापूर तालुक्याची वरदायिनी समजल्या जाणाºया शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडण्यात आले आहे़ हे पाणी शिरापूर, मोहितेवाडीमार्गे वडाळा येथे येत आहे़
वडाळ्यात आलेले पाणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर कप स्पर्धेत तयार झालेल्या शेततळ्यात सोडण्यात आले आहे़ यामुळे वर्षानुवर्षे कोरडेठाक असलेली शेततळी पाण्याने तुडुंब भरली आहेत़
मागील तीन ते चार वर्षांपासून उत्तर सोलापूर तालुका दुष्काळाने ग्रासला होता़ शिवाय शिरापूर उपसा सिंचन योजनेत उजनीतून पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांमधून लावून धरली होती़ यंदा तालुक्यात कमी पाऊस झाला असला तरी उजनी धरणातून शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे़