संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी व्होळेतील शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:03+5:302021-06-29T04:16:03+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात व्होळे (खु) येथील १८० शेतकऱ्यांची जमीन सीना- माढा उपसा सिंचन योजनेत भूसंपादित केली गेली. १२ ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात व्होळे (खु) येथील १८० शेतकऱ्यांची जमीन सीना- माढा उपसा सिंचन योजनेत भूसंपादित केली गेली. १२ वर्षांनंतरही त्याचा मोबदला शासनाकडून मिळाला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी भाजपचे तालुका चिटणीस प्रकाश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या दालनात जाऊन साकडे घातले.
दरम्यान, सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत शासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. परंतु जमिनीचा मोबदला द्या, गेली १२ वर्षे मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहाेत, अनेक समस्यांना तोंड देत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडला. ही व्यथा जाणून घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच मोबदला मिळेल अशी ग्वाही दिली गेली. मात्र, या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात अमोल वजाळे, बंडू परांडे, मुकुंद वजाळे, शिवाजी चोपडे, महावीर चोपडे, राजेंद्र कासवेद, आण्णा कासवेद, आदीकराव कासवेद, कृष्णा चोपडे, प्रसन्नजीत वजाळे, रजनीकांत वजाळे सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
...................
फोटो : २८ होळे
कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर व्होळे येथील शेतकरी जमिनीचा मोबदल्यासाठी ठिय्या आंदोलन केले.