दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 10:52 AM2021-08-14T10:52:06+5:302021-08-14T10:52:12+5:30

मोबदला मिळेना - बाळे रेल्वेस्थानक परिसरातील शेतकरी आक्रमक

The farmers stopped the work of doubling, electrification and repair of railway tracks | दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले

दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - १६ वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न दिल्याने संतप्त झालेल्या बाळे स्थानक परिसरातील शेतकऱ्यांनी दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम थांबविले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाच्या कामासाठी २००६ साली जमिनीचे भूसंपादन झाले. त्यावेळी योग्य तो मोबदला देऊ असे सांगितले; मात्र रेल्वेने अद्याप त्या परिसरात कामच सुरू केले नव्हते. मागील महिन्यांपासून या परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू झाले; मात्र शेतकऱ्यांनी हे काम थांबविले. आता रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती व लेव्हल क्रॉसिंग रोडच्या दुरुस्तीसाठी रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४ बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी बाळे ते केगाव रस्ता बंद असल्याचे जाहीर करून पर्यायी वाहतुकीने वाहतूक करण्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले; मात्र मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे सुरू असलेले काम मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थांबविल्याने रेल्वे प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

-----------

जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवते

फेब्रुवारी महिन्यात संतप्त शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून योग्य मोबदला देण्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ते मान्य करून संमतीपत्रावर सह्या केल्या. दरम्यान, शिंदे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर भूसंपादन पदाचा पदभार समिंदर यांच्याकडे आला. त्यांनी त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी नवा दर काढला. त्या दराला शेतकऱ्यांनी विरोध केला. नवा दर हवा असेल तर तसा प्रस्ताव द्या असे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले. मागील काही वर्षांपासून फक्त जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवत असल्याचा आरोप अमोल काळजे, विकास काळजे, गौराबाई जक्कापुरे, गौरीशंकर कराळे, भालचंद्र कराळे, रामचंद्र कराळे, अ.गफूर अ.सत्तार जमादार, संजय काळजे या शेतकऱ्यांनी केला आहे.

---------------

शेतकऱ्यांचा रेल्वेच्या कामास विरोध नाही. आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला द्या, मगच काम सुरू करा. आम्ही तुमच्या कामास सहकार्य करू. जिल्हाधिकारी कार्यालयामुळेच भूसंपादनाचे पैसे मिळण्यास उशीर होत आहे. यात रेल्वे विभागाची काहीच अडचण नाही. ते पैसे देण्यास तयार आहेत. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने तसा अहवाल, प्रस्ताव देणे गरजेचे आहे.

- अमाेल काळजे, शेतकरी, बाळे रेल्वेस्थानक, सोलापूर

------------

रेल्वे पैसे देण्यास तयार पण...

संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून अंतिम अहवाल आला नसल्याने बाधित शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल त्वरित दिल्यास आम्ही तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The farmers stopped the work of doubling, electrification and repair of railway tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.