बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:46+5:302021-01-08T05:09:46+5:30
सरत्या वर्षात पावसाचे प्रमाण चांगले झाले असले तरी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक अपत्तीने हिरावून घेतला. ...
सरत्या वर्षात पावसाचे प्रमाण चांगले झाले असले तरी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक अपत्तीने हिरावून घेतला. खरीप हंगामात अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यास आर्थिक नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बीची पेरणी केली. सध्या पिकेदेखील जोमात आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून थंडी पूर्णतः गायब झाल्याने गहू, हरभरा पिके धोक्यात येत आहे. गारठ्याचे प्रमाण कमी झाल्याने गहू पिकावर तांबेरा तर हरभाऱ्याला अळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
ज्वारीचे शिवार फुलले
ज्वारीच्या हिरव्यागार पिकाने शिवार फुलून गेले आहे, परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून हवामानातील अचानक झालेला बदल पाहता अवकाळी होऊन ज्वारीचा फुलोरा धुवून जातो की काय? अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या रब्बीच्या पिकांबरोबर फळबागांचे नुकसान होणार की काय? अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.