कोरोनात आयुर्वेदाचा फास्ट इफेक्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:34+5:302021-05-26T04:23:34+5:30
प्राचीन काळातही साथीचे रोग होतेच. आयुर्वेदात तर जनपदोध्वंस हा अध्यायच वर्णन केलेला आहे. त्यावेळी प्राण वाचविण्यासाठी... जे उपाय प्राणरक्षक ...
प्राचीन काळातही साथीचे रोग होतेच. आयुर्वेदात तर जनपदोध्वंस हा अध्यायच वर्णन केलेला आहे. त्यावेळी प्राण वाचविण्यासाठी... जे उपाय प्राणरक्षक वनौषधी व रसौषधींद्वारे सांगितले त्यांचा उपयोग आमच्या सारखे अनेक आयुर्वेद वैद्य देशभरात करीत आहेत. लाखो रुपयांची इंजेक्शन देऊनही ऑक्सिजन पातळी घसरून, प्रकृती खालावत चाललेल्या कित्येक रुग्णांना ... आयुर्वेदातील प्राणरक्षक औषधीच्या २/४ डोसमध्येच ७५ वरून ९५ पर्यंत ऑक्सिजन पातळी वाढून... सी.आर.पी., डी-डायमरसह इतर रिपोर्ट्स सुद्धा नॉर्मल होत आहेत. देशभरात ठिकठिकाणी अनेकांना मृत्यूच्या जबड्यातून आयुर्वेद लीलया बाहेर काढत आहे. अगदी मुंबई, पुण्यापासून... नगर-नागपूरपर्यंत... कित्येक कोरोना रुग्णांचा उपचार आयुर्वेदाने यशस्वीरित्या होत आहे. आज अनेकांना केमिकल इंजेक्शनच्या कमालीच्या साईड इफेक्टसची औषधी द्यायचीही गरज पडू दिली नाही. आयुर्वेदाने सुखरुपपणे कोरोनामुक्त केले आहे. तसेच पोस्ट कोविडचीही ४५ दिवसांची आयुर्वेद किट व श्वसनाचे व्यायाम ही चिकित्साही सुरू आहे.
मृत्यू... काय सुचवून जातोय ?
इतर देशांत...केमिकल पॅथीज आहेत, परंतु भारतासारख्या देशात... जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र आयुर्वेद आहे... त्याचा उपयोग सर्वप्रथम केरळ राज्याने मार्च २०२० लाच, आयुर्वेद टास्क फोर्स स्थापन करून, आयुर्वेद उपचाराची मदत घेऊन कोरोना रुग्णांचा मृत्यूदर... कमी केला.
दुर्दैवाने महाराष्ट्रासह इतर राज्यांनी आयुर्वेद टास्क फोर्स स्थापन केला नाही, अन्यथा.. आजचे चित्र कदाचित वेगळे राहिले असते. दिनांक ०६ ऑक्टोबर २०२० ला, उशिरा का होईना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोविड उपचाराचा आयुर्वेद प्रोटोकॉल घोषित केला.
कोरोना उपचाराचा आयुर्वेद विचार...
खरं म्हणजे भलेही कोरोनाचा उल्लेख... प्राचीन ग्रंथात नसला तरीही... जनपदोध्वंस या अध्यायात त्याकाळातील साथीच्या आजाराचे वर्णन केले आहे, त्यातील प्रामुख्याने सान्निपातज ज्वर चिकित्सा वर्णन केलेली आहे. तसेच कोरोना चिकित्सा करताना आयुर्वेद उपचाराचा प्राचीन ग्रंथोक्त आधार खालीलप्रमाणे घेतला जात आहे. वातश्लेष्मज ज्वर :- लक्षणे : शीतक (थंडी वाजणे), गौरव (जडपणा), तंद्रा (गुंगी वाटणे), शिरोग्रह (डोके जड वाटणे),प्रतिश्याय(सर्दी), कास (खोकला), संताप (ताप), अतिवाक् (बडबड करणे). यात पित्ताचा अनुबंध असल्यास... वरील लक्षणांसोबत... कंठमुखशोष (तोंड व घसा कोरडा पडणे), अरुची (चव न लागणे), भ्रम (चक्कर येणे), मुर्च्छा (बेशुद्ध होणे), तृष्णा (तहान लागणे) वरील अनेक लक्षणांद्रारे आयुर्वेद चिकित्सा यशस्वीपणे केली जात आहे. काही जण शुद्ध आयुर्वेद घेत आहेत तर काहीजण... हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाही ॲलोपॅथीच्या औषधांसोबत ९० मिनिटांचे अंतर राखून आयुर्वेद औषधी २४ तासांत २ वेळा घेऊनही कित्येक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
अमेरिका युरोपियन देशांमध्ये क्रषीमुनी झाले नाहीत परंतु, भारतासारख्या देशांत याच मुनींनी निस्वार्थपणे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आयुर्वेद निर्माण केला... त्यात त्यांनी हजारो औषधींचे फॉर्म्युले लिहून ठेवले, एवढेच काय तर... प्राचीन काळातही इमर्जन्सी येत होत्याच ना ! त्याकाळातील गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी, इमर्जन्सी मेडिसीन तत्काळ परिणाम करणाऱ्या अनेक रसौषधीं जीभेखाली चाटवून प्राणरक्षण केले (आज हार्ट ॲटॅक येत असताना, प्राण वाचावेत म्हणून जीभेखाली सॉरबिट्रेट गोळी, किंवा अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर नेफेडीपिन नावाची सॉफ्जेल सुद्धा जीभेखालीच दिली जाते बरं का !... आधुनिक वैद्यकात सबलिंज्युअल रूट असे म्हणतात, आणि जीभेखालील लाळेद्वारे हृदयात जलद गतीने औषधी पोहोचते ज्यायोगे रुग्णांचा प्राण वाचतो. त्यामुळे आयुर्वेद औषधी इमर्जन्सीत मधासोबत पुन्हा पुन्हा चाटविणाऱ्या वैद्यांना नावे ठेवू नयेत.)
आजकाल फक्त प्रोटीन्सचा प्रतिकारशक्तीशी असलेला विचार करून कोरोना रुग्णाला, ऊठसूठ मांसाहार करण्याचा सल्ला दिला जातोय, खरं म्हणजे त्याचा अग्नीविचार (भूक) करूनच आयुर्वेद चिकित्सक उपचार करीत असतो, मुळात अग्नीमंद झाल्याने रुग्णाचे पोट बिघडते, साफ होत नाही अशातच मांसाहार त्याला त्रासदायक ठरतो... म्हणून फक्त प्रोटीन्सचाच विचार केला तर इतर दाळींसोबतच मूगदाळ सर्वश्रेष्ठ आहे. डाळिंब, खजूर, बदाम, आक्रोड सर्वोत्तम फळे आहेत; मात्र केळी, सीताफळ, पेरू, आंबा, दही, दूध वगैरे कफ वाढविणारे असल्याने टाळावे.
डॉ. शिवरत्न शेटे एम.डी. (आयुर्वेद, शिवचरित्र व्याख्याता तथा सदस्य : आयुष मंत्रालय, भारत सरकार.
९८९०२६७०२६