अंतिम नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:35+5:302021-06-27T04:15:35+5:30
अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अकलूज-माळेवाडी, नातेपुते या तीनही गावच्या नागरिकांनी २२ जूनपासून साखळी ...
अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अकलूज-माळेवाडी, नातेपुते या तीनही गावच्या नागरिकांनी २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अकलूज ग्रा.पं. सदस्य संजय साठे, माळेवाडीचे सदस्य सतीश साठे, नातेपुतेचे सदस्य अजय भांड, उत्कर्ष शेटे, विशाल जगताप, सतीश थोरात, सराफ असोसिएशन, शिवाजी चौक, रामायण चौक असे २४५ नागरिक सहभागी झाले होते.
उपोषणस्थळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, उपसभापती प्रताप पाटील, शिवामृत दूध संघाचे संचालक संग्रामसिंह रणवरे, भाजप तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजप संघटन सरचिटणीस संजय देशमुख, संदीप घाडगे, हमीद मुलाणी यांनी भेट दिली.
भारतीय जनता पक्ष माळशिरस तालुकाच्या वतीने बाजीराव काटकर, परिवर्तन कला महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशवंत गेजगे, सोलापूर जिल्हा भाजप किसान मोर्चाच्या वतीने बाळासाहेब सरगर, नवक्रांती प्रतिष्ठान अकलूजतर्फे आकाश शिंदे, महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेतर्फे सचिन गुळवे यांनी मनोगत व्यक्त केले. तर संग्रामसिंह मित्र मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, सराफ व सुवर्णकार संघ अकलूज यांनी उपोषणास पाठिंबा असल्याचे निवेदन दिले.
स्वरतरंग ऑर्केस्ट्राचाही सहभाग
उपोषणकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व अकलूज नगरपरिषद होण्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी अकलूज येथील स्वरतरंग ऑर्केस्ट्रातर्फे अजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धार्मिक व देशभक्तीपर गीत सादर करून एकजुटीचे वातावरण निर्माण करीत अनोख्या पद्धतीने आंदोलनात सहभाग नोंदविला.