एकमेकांचे दर्शन न झाल्याने अगाेदर वडील नंतर मुलीने सोडला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:50+5:302021-05-08T04:22:50+5:30
अक्कलकोट : आईच्या मृत्यूनंतर मुलीनेच वडिलांचा तब्बल २५ वर्षे सांभाळ केला. पण ती मुलगी चार दिवसांपासून नजरेस पडेना, तिला ...
अक्कलकोट : आईच्या मृत्यूनंतर मुलीनेच वडिलांचा तब्बल २५ वर्षे सांभाळ केला. पण ती मुलगी चार दिवसांपासून नजरेस पडेना, तिला काय झाले, याचा धसका घेऊन वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांनी गेल्या काही दिवसांपासून अन्न सोडल्याच्या काळजीमुळे मुलीलाही अशक्तपणा आला अन् हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हॉस्पिटलमध्ये असतानाच वडिलांच्या निधनाचे वृत्त समजले आणि शोक अनावर होऊन मुलीनेही जीव सोडला.
सोलापुरातील सैफुल येथील रोहिणी भाग क्रमांक दोनमध्ये चित्रसेन गुरव हे नुकतेच पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. ते पत्नी भारती गुरव, अविनाश, अमोल ही दोन मुले आणि श्रीदेवी, मंजू या दोघी सुना, मुलगी ज्योती व नातवंडे असा परिवार गुण्यागोविंदाने राहताे. भारती गुरव यांचे वडील मलकप्पा फुलारी हे गेल्या २५ वर्षांपासून याच घरात राहत होते. मलकप्पा फुलारी यांना एकूण चार मुली आहेत. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर मुलगी भारती यांच्याकडे ते राहात होते. आठ दिवसांपासून वडिलांनी अन्न सोडले. याचा मुलगी भारती यांच्याही मनावर ताण येऊन त्यांनाही अशक्तपणा आला. वडील घरामध्ये तर मुलगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. घरात चार दिवस मुलगी न दिसल्याने धसका घेऊन ८५ वर्षीय वडिलांनी प्राण सोडला. त्यांच्यावर कर्नाटकातील अफजलपूर तालुक्यातील तेल्लूणगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुंभारी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मुलीला दुसऱ्या दिवशी वडिलांच्या निधनाचे वृत्त समजताच धसका घेऊन तिच्याही मृत्यू झाला आहे. भारती या ५७ वर्षांच्या होत्या.
जीवापाड सांभाळलेल्या वडिलांचे अंतिम दर्शनही झाले नाही
ज्या मुलीने स्वतःच्या वडिलांना तब्बल २५ वर्ष जीवापाड सांभाळले, त्यांची सेवा केली. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नसल्याची खंत गुरव परिवारामधून व्यक्त केली जात आहे.
०७मलकप्पा फुलारी - वडील
०७भारती गुरव - मुलगी