पोलीस अधिकारी बनले सासरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:34+5:302021-09-26T04:24:34+5:30
अक्कलकोट : मैदर्गी येथील प्रेयसी व प्रियकर हे आंतरजातीय विवाहाला तयार असताना केवळ प्रियकराच्या कौटुंबिक विरोधामुळे विवाह रखडला होता. ...
अक्कलकोट : मैदर्गी येथील प्रेयसी व प्रियकर हे आंतरजातीय विवाहाला तयार असताना केवळ प्रियकराच्या कौटुंबिक विरोधामुळे विवाह रखडला होता. अखेर मुलीने दक्षिण पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्यासमोर स्वत:ची प्रेम कहाणी कथन केली. तेव्हा कारवाई करण्याऐवजी दोन्ही कुटुंबप्रमुखांना बोलावून घेऊन तासभर समुपदेशन केले अन् सर्वांनी एकमताने होकार दिला. त्याचवेळी मनाचा मोठेपणा दाखवत ठाण्यातच पोलिसांनी स्वखर्चाने लग्न लावून दिले.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्व तक्रारींकडे कायदेशीर कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता काही वेळा न्यायिक दृष्टीने पाहिले जाते आणि यातून समाजहिताचे पाऊल उचलण्याचा अनुभव अक्कलकोटकरांनी घेतला आहे. पोलीस निरीक्षक काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
सचिन कांबळे (वय २५, रा. मैदर्गी, ता. अक्कलकोट) हा बांधकाम मिस्त्री म्हणून काम करताे. यलव्वा टोणगे (वय २२) ही त्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करते. काम करता-करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही लग्न करण्याची इच्छा झाली. एके दिवशी सचिनने स्वत:च्या कुटुंबीयासमोर लग्नाचा विषय उपस्थित केला. त्याच्या घरच्यांनी त्याच्या एकतर्फी प्रेमविवाहाला विरोध दर्शवला. इच्छा असूनही मुलास विवाह करता येत नव्हता. मुलीच्या आई, वडिलाचे यापूर्वीच निधन झाल्याने ती आजीकडे राहते. तिला कोणाचेच पाठबळ नाही. मुलाकडील सदस्यांनी विरोध केल्याने अखेर तिने थेट दक्षिण पोलीस ठाणे गाठले.
पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्यासमाेर वस्तुस्थिती मांडली. तेव्हा कारवाईचा मार्ग न अवलंबता नातेवाइकांना बोलावून समुपदेशन केले. अखेर दोघांच्या कुटुंबाने लग्नाला होकार दिला.
शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यातच तयारी झाली. त्यानंतर तत्काळ ठाण्यातील पोलीस लग्नाचे साहित्य खरेदीसाठी गेले. रात्री १०.३० वाजता ठाण्यात वधू-वरांच्या विधिवत लग्नाच्या गाठी बांधण्यात आल्या. त्यानंतर अल्पोपाहार घेऊन नातेवाइकांनी गाव गाठले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, आदी जण उपस्थित होते.
----
अन् पाेलिसांनीच बांधला लग्नाचा बस्ता
पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड, हवालदार सुरेश जाधव, अजय भोसले, प्रवीण लोकरे, सुनील माने, एजाज मुल्ला, केदारनाथ सुतार, महादेव शिंदे, अमोगसिद्ध वाघमोडे, संजय पांढरे, महिला पोलीस चमेली राजमाने, जोश्ना सोनकांबळे यांनी मुलीचे कपडे, मणी, मंगळसूत्र, साडी, मुलाचा आहेर, भांडी, हार, गुच्छ आदी प्रकारचे साहित्य बघता बघता खरेदी करून आणले.
---
पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी स्वखर्चातून लग्न साहित्य खरेदी करून लग्न लावून कन्यादान केले. यावेळी त्यांनी एक प्रकारे सासऱ्याची भूमिका वठवली. तब्बल दोन तास या कुटुंबाचे समुपदेशन केले. पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच आशा प्रकारचे शुभकार्य घडल्याने पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अक्कलकोट पोलिसांचे कौतुक केले.
----
फोटो :
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात प्रेमीयुगुलाचे समुपदेशन करून आंतरजातीय विवाह लावून देताना पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, मल्लिकार्जुन पाटील, सद्दाम शेरीकर.