जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा; खुनाचा अवघ्या १२ तासाच्या आत उलगडा
By Appasaheb.patil | Published: November 16, 2023 03:32 PM2023-11-16T15:32:29+5:302023-11-16T15:32:42+5:30
पथकास मयताच्या राहत्या गावी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
सोलापूर : दारूच्या नशेत घरातील लोकांना त्रास देणा-या बापाचा मुलानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात सोलापूर ग्रामीण पेालिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्याच त्रासास कंटाळून मी वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली.
दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना पोलिसांना कळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जलदगतीने तपास करण्यास सुरूवात केली. दरम्यान, या गुन्हयातील अनोळखी व्यक्ती ही कोंडबावी (ता. माळशिरस) या गावातील असल्याची माहिती मिळाली. मयताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून माझे वडिल पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. तेंव्हा मयताचा मुलगा सुरज पांडूरंग सावंत (वय २४) याने अज्ञात व्यक्तीविरूध्द फिर्याद दिली होती.
या गुन्हयातील मयत हा कोंडबावी गावचा रहिवाशी असल्याने पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास मयताच्या राहत्या गावी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सुचनेनुसार पेालिस गावात पोहोचले. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करीत असताना मयताच्या मुलानेच मयतास मारल्याचे सांगण्यात आले. या माहितीवरून मयताच्या मुलास पेालिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी करीत असताना मयताच्या मुलाने सांगितले की, माझे वडिल हे मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन सारखे सर्वांना शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्यांचे त्रासास कंटाळून वडिल घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने वार करून जिवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पेालिसांनी मयताच्या मुलास अटक केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रविण सपांगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पेालिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सफौ/ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड यांनी बजावली आहे.