सीईटी परीक्षेसाठी मुलाला घेऊन चाललेला पिता अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:58 AM2020-10-21T11:58:01+5:302020-10-21T11:59:24+5:30
केगाव येथील घटना; टेम्पो चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : सीईटी परीक्षेसाठी मुलाला घेऊन आलेल्या पित्याचा केगाव येथील सिंहगड कॉलेजसमोर टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणबसप्पा म्हेत्रे (रा. गौडगाव (बु), ता. अक्कलकोट) असे ठार झालेल्या पित्याचे नाव आहे. शरणबसप्पा म्हेत्रे यांचा मुलगा केदार शरणबसप्पा म्हेत्रे (वय १९) याची सीईटीची परीक्षा होती. सीईटीच्या परीक्षेसाठी त्याचा नंबर सोलापुरातील केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आला होता. शरणबसप्पा म्हेत्रे हे सोमवारी पहाटे उठून मुलगा केदार म्हेत्रे त्याला घेऊन मोटरसायकल (क्र. एमएच 13/बीए ०३५३) वरून सोलापुरात आले.
सिंहगड कॉलेजसमोर गर्दी असल्यामुळे त्यांनी त्यांची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरील उजव्या बाजूला लावली. मुलाला घेऊन ते त्याचा नंबर कुठे आला आहे हे पाहण्यासाठी जात असताना पुण्याच्या दिशेहून सोलापूरकडे येणा?्या टेम्पो (क्र. एमएच ०५/ डीके ८४९३) ने जोरात धडक दिली. धडकेत शरणबसप्पा म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले. त्यांना मुलांनी तत्काळ रिक्षात घालून सोलापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास फौजदार सचिन मंद्रूपकर करीत आहेत.
जखमी पित्याला उचलून मुलाने घातले रिक्षात
- टेम्पोने धडक दिल्यानंतर वडील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यामध्ये पडले होते. परीक्षेचा नंबर बघण्यासाठी पुढे गेलेल्या मुलाने वडिलांकडे धाव घेतली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना स्वत:च्या हाताने उचलले. रस्त्यावरून जाणा?्या रिक्षाला थांबून आतमध्ये घातले. वडिलांना वाचविण्यासाठी त्याने रिक्षाचालकाला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि शेवटी त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.