पितृपंधरवडा; दिवंगत व्यक्तीचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 08:44 PM2018-10-02T20:44:18+5:302018-10-02T20:50:43+5:30
दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पंधरवडा असे म्हणतात. महालय या शब्दाचे अपभ्रष्ट रुप महाळ असे होते, असे डॉ. अपर्णा कल्याणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एकीकडे अपत्ये जन्माला येतात तर दुसरीकडे वृद्ध व्यक्ती देह ठेवीत असतात. त्यांचे कौटुंबिक, सामाजिक दायित्व, उत्तमोत्तम गुणांचा वारसा पुढच्या पिढीकडे येत असतो. तथापि जे इहलोक सोडून गेले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. पूज्यभाव व्यक्त करावा, ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. तिला अनुसरुनच श्राद्ध संस्काराची संकल्पना उदयाला आली. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. महालय हा देखील एक श्राद्ध विधी आहे.
किंबहुना नेहमीच्या वर्षश्राद्धापेक्षाही महालय श्राद्ध अधिक महत्त्वाचे आहे, नेहमीचे वर्षश्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला अर्थात पणजोबा, आजोबा, वडील यांना उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. महालयात दिवंगत आई-वडील, वडिलांचे आई-वडील, आजी-आजोबा, आईचे आई-वडील, स्वत:चे सासू-सासरे, भाऊ, वहिनी, बहीण, मेव्हणा, आत्या, काका-काकू, मावशी, मामा-मामी, गुरु, आश्रयदाते, उपकारकर्ते, पाळीव प्राणी लावून तोडलेले वृक्ष, देशासाठी प्राणार्पण करणारे सैनिक, शेतकरी, सर्वच क्षेत्रांमधील आदरणीय, श्रद्धेय व्यक्ती अशा सर्वांसाठी कृतज्ञता, ऋण व्यक्त करायचे असते. तिथीदिनी श्राद्ध करणे जमले नाही तर सर्वपित्री अमावस्येला सगळ्या पितरांचे श्राद्ध करता येते. पितृपक्षात पितरांचे वास्तव्य पृथ्वीवर असते. पूर्वजांचे शुभाशीर्वाद आणि कृपा प्राप्तासाठी पितृसूक्तांचे पठण आणि हवनही केले जाते. त्यामुळे सर्वांनी पितरांचे महालय श्राद्ध अवश्य करावे, असे डॉ. अपर्णा कल्याणी सांगतात.