मुलांवर मुखाग्नी देताना वडिलांचे हात थरथरले, धाडस होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:44+5:302021-04-20T04:22:44+5:30
केगाव बु. येथील सख्ख्या चुलत अविवाहित बंधूंचा पुणे येथे अपघात झाला. त्यांची दुचाकी एमएच १३ डीएफ ७०३२ दुभाजकाला धडकल्याने ...
केगाव बु. येथील सख्ख्या चुलत अविवाहित बंधूंचा पुणे येथे अपघात झाला. त्यांची दुचाकी एमएच १३ डीएफ ७०३२ दुभाजकाला धडकल्याने ते दोघे जागीच ठार झाले. ही घटना १७ रोजी रात्री १२ वाजता घडली. १८ रोजी सायंकाळी ७ वाजता केगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. यामुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत होती.
अधिक माहिती अशी, मयत पंकज इरय्या देसाई (२७, शिक्षण - इंजिनिअरिंग), राहुल सिद्धाराम देसाई (२४, शिक्षण - १२ वी) हे दोघे पुणे येथील एका कंपनीमध्ये नोकरीला होते. सध्या संचारबंदी असून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कंपनी बंद आहे. पुन्हा लवकर सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे १७ एप्रिल रोजी रात्री दुचाकीवरून हे दोघे मूळगावी केगावकडे निघाले. पुण्यातच डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच ट्राफिक पोलीस दिसले. यावेळी पोलीस पकडतील या भीतीने दुचाकी गतीने चालविल्याने ती दुभाजकाला धडकली. त्यात हे दोघे भाऊ जागीच ठार झाले.
ही माहिती पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यांनी मोबाइलवरून लगेच ही माहिती नातेवाइकांना कळविली. त्यानंतर शेजारील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह रविवारी दुपारी १२ वाजता नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यांचे मृतदेह केगाव येथे आणून सायंकाळी ७ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. राहुलच्या पश्चात वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
फोटो
१९पंकज देसाई
१९राहुल देसाई