coronavirus; एकीकडे कोरोनाचे भय अन् दुसरीकडे अफवांचे ढीगभर पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 04:00 PM2020-03-27T16:00:56+5:302020-03-27T16:08:53+5:30
सोलापूरकरांचे जागरण; एकुलता एक मुलगा असल्यास झोपायचे नाही
रुपेश हेळवे
सोलापूर : एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने सर्वांची झोप उडवली आहे तर दुसरीकडे सोलापुरात विविध अफवांना पेव फुटले आहे़ सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्या घरात एक मुलगा आहे त्यांनी रात्री झोपायचे नाही आणि मुलालाही झोपू द्यायचे नाही अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ यामुळे अफवांना बळी पडलेल्या सोलापूरकरांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.
कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे नागरिक हे घरातच बसून आहेत़ यामुळे अशा अफवांना पेव फुटत आहे़ या अफवा शक्यतो कामगार वस्तीमध्येच फैलावत आहेत. यामुळे याला बळी पडणाºयांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे़ मंगळवारी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी ९ घरातून १ तांब्या पाणी घेऊन येऊन ते पाणी लिंबाच्या झाडाला घालावे अन्यथा कोरोनाचा प्रकोप आपल्या घरावर होईल अशी अफवा सोलापुरातील भागात पसरवण्यात आली़ यामुळे अनेक लोक हे या अफवेला बळी पडले.
बुधवारी दुसरी अफवा पसरवण्यात आली़ यात ज्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा दोन मुले आहेत त्यांनी रात्री झोपू नये अशी अफवा पसरवण्यात आली़ यामुळे या अफवेला बळी पडत अनेकांनी अख्खी रात्र जागून काढली़ अशा अफवांमुळे सामान्य नागरिकाचा बळी जात आहे़ यामुळे अशा अफवा पसरवणाºयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
दुपारी झोपू नका नाहीतर... कायमचे झोपाल
- सोलापुरात अनेक अफवा पसरत असून गुरुवारी आणखीनच नवीन अफवा पसरवली आणि गुरुवारी दुपारी झोपू नका नाहीतर तुम्ही कधीच उठणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली़ यामुळे अनेकजण दुपारची वामकुक्षीही घेऊ शकले नाहीत.
नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये़ अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये़ काही समाजकंटक आपण काहीतरी वेगळेपण करतो हे दाखवत असतात़ स्वत:ची प्रसिद्धी करायची असते म्हणून असे संदेश पाठवत असतात़ हे पूर्णत: चुकीचे आहे़ यामुळे अशांवर विश्वास ठेवू नये़
- पुंडलिक मोरे,कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर
कोरोना व्हायरसपासून सुरक्षा मिळण्यासाठी ९ घरातून तांब्याभर पाणी आणून लिंबाच्या झाडाला घालावे असे सांगितले होते़ त्यामुळे भीतीपोटी आम्ही ही प्रथा पाळली़
- ममता गोणे, नागरिक