तलवारीचा धाक दाखवून ग्रा.पं. सदस्याच्या दिरासह त्याच्या मित्राचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:19+5:302021-02-25T04:28:19+5:30
देवाप्पा हरिबा खरात व दगडू कृष्णा काबुगडे (दोघेही रा. पाचेगाव बु.) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. पाचेगाव येथील देवाप्पा ...
देवाप्पा हरिबा खरात व दगडू कृष्णा काबुगडे (दोघेही रा. पाचेगाव बु.) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. पाचेगाव येथील देवाप्पा हरिबा खरात व दगडू कृष्णा काबुगडे हे २३ फेब्रुवारी रोजी सायं. ७ वा. गावातील विठ्ठल मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. कीर्तन संपल्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून घराकडे निघाले होते, तर त्यांच्या पाठीमागे भाऊ धोंडिबा खरात व तानाजी पांढरे येत होते. ते दोघे पिंटू भले यांच्या शेताजवळ आले असता पाठीमागून पांढऱ्या रंगाची ९९९९ व एमएच १६/ एबी ३५५९ अशा चारचाकी दोन वाहनांपैकी ९९९९ ही कार देवाप्पाच्या दुचाकीला आडवी लावून थांबवली. त्यावेळी दोन्ही कारजवळ समाधान ऊर्फ पप्पू कर्चे, मुरारजी कर्चे, सचिन बोरकर, समाधान मंडले, अमोल मंडले, किरण मलमे, नवनाथ चव्हाण असे सात जण उभे होते. त्यांनी देवाप्पा खरात यास, ‘तुझी भावजय वैशाली खरात हीस २६ तारखेला सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या पार्टीत घेऊन ये’, असे म्हणताच त्याने, ‘आम्ही तुमच्या पार्टीत येणार नाही’, असे सुनावले. यावेळी त्यांनी देवाप्पास शिवीगाळ, दमदाटी करून कारमध्ये ढकलून बसवत असताना दगडू काबुगडे यांनी धरले. त्यावेळी त्या सर्वांनी त्या दोघांना तलवारीचा धाक दाखवून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर धोंडिबा खरात व तानाजी पांढरे यांनी दुचाकीवरून कारचा जुनोनीपर्यंत पाठलाग केला असता ते सापडले नाहीत. याबाबत, भाऊ धोंडिबा हरिबा खरात यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.