फेब्रुवारीतच रेल्वेला मिळाले अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:14+5:302021-03-15T04:21:14+5:30
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल ...
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल आहे.
रेल्वेने किसान रेल्वे सुरू करून सोलापूर व शेजारच्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबू, पेरू, बोर, सीताफळ, खरबूज, शिमला मिरची यासह इतर फळपिकांना बिहार, कोलकत्ता, दिल्ली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण सुधारले आहे.
सांगोला रेल्वेस्थानकातून सांगोला ते हावडा, सांगोला ते आदर्शनगर (दिल्ली), सांगोला ते शालिमार (कोलकाता), सांगोला-मुझफ्फरपूर अशा चार किसान रेल्वे सुरू असल्यामुळे सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे.
हंगामानुसार या किसान रेल्वेतून फळपिकांची वाहतूक करण्यात येत आहे. सध्या सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना किसान रेल्वे वरदान ठरत आहे.
५२ हजार ५७४ क्विंटल मालाची वाहतूक
सोलापूरच्या द्राक्षाला कोलकाता, दिल्ली व बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत किसाने रेल्वेद्वारे तब्बल ५२ हजार ५७४ क्विंटल द्राक्ष, खरबुजाची वाहतूक करण्यात आली असून, अद्यापही द्राक्षाची वाहतूक सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात रेल्वेला २ कोटी ४९ लाख २७ हजार ७७५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ
गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी सांगोला स्थानकातून पहिली किसान रेल्वे धावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाच किसान रेल्वे सुरू केल्या. ऑगस्टपासून किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न सांगोला स्थानकातून रेल्वेला मिळाले, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षांच्या बागा असल्याने किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. मार्च महिन्यात रेल्वेला तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::
किसान रेल्वेने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविली. कमी वेळेत शेतीमाल देशातील बाजारपेठेत पाठविणे शक्य झाले आहे. वाहतूक दरात ५० टक्के सबसिडी दिली जात आहे. उत्पन्नाच्या बाबतीत रेल्वेच्या सोलापूर विभागात सांगोला रेल्वेस्थानक प्रथम क्रमांकावर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान रेल्वेच्या सुविधेचा लाभ घ्यावा.
- चेतनसिंह केदार-सावंत
तालुकाध्यक्ष, भाजप
फोटो ओळ ::::::::::::::::::::::::
परराज्यातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांनी डाळिंबासह द्राक्ष, खरबूज, शेती मालासह गर्दी केल्याचे छायाचित्र.