उंदराने पोखरलेले शेततळे फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:24 AM2019-07-26T02:24:24+5:302019-07-26T02:24:29+5:30
एक कोटी लीटर पाणी वाया; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
सांगोला (जि़ सोलापूर) : उंदराने पोखरलेल्या बिळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याने तुडुंब भरलेले शेततळे अचानक फुटले. याुमळे सुमारे १ कोटी लीटर पाणीसाठा वाहून गेल्याने शेतकºयाचे १ लाख रुपयाचे नुकसान झाले.
वाटंबरे येथील शेतकरी नारायण शंकर पवार यांनी सहा महिन्यापूर्वी आपल्या शेतात स्व:खचार्तून ४२ मीटर रुंदी, ४२ मीटर लांबी व १३ मीटर खोलीचे १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे मातीचे शेततळे तयार केले होते. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पाणी व डाळींब बाग जगविण्यासाठी लाखो रुपये खर्चून शेततळे तयार करुन उन्हाळ्यातही या शेततळ्यात सुमारे ५० लाख लिटर पाणीसाठा केला होता.
भीषण उन्हाळ्याच्या काळात शेततळ्यातील पाणी सातत्याने उपसा केल्यामुळे शेततळ्याने तळ गाठला होता. दरम्यान या शेततळ्याला खालून उंदीर किंवा घुशीने पोखरल्याचे कागदामुळे दिसून आले नाही. अशा परिस्थितीत सांगोला शाखा क्र. ५ ला आलेल्या पाण्यातून नारायण पवार यांनी शेततळे भरुन घेतले होते; मात्र पोखरल्यामुळे अचानक पोकळी होत कागद खाली जावून भगदड पडले आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. शेतकºयाला काही कळण्यापूर्वीच सुमारे १ कोटी लिटर पाणीसाठा वाहून गेला. शेततळ्यातील पाणी डोळ्या समक्ष वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.