२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:36+5:302021-01-25T04:22:36+5:30
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भाने मुख्य ...
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माळशिरस पंचायत समितीमध्ये आढावा बैठकही झाली होती. त्या अनुषंगाने तालुक्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूर्ण झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ५ ते ८ वर्ग असणाऱ्या शाळा तर खाजगी अनुदानित, विनाअनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इतक्या शाळा २७ जानेवारीपासून जय्यत पूर्व तयारीनंतर सुरू होत आहेत. शाळा सुरू होत असताना कमी दप्तर, घरचा डब्बा, सेनीटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी केले आहे.
२५२ शाळा सुरू होणार
माळशिरस तालुक्यात ५ ते ८ वर्ग असणाऱ्या झेपीच्या १४४, खाजगी अनुदानित ६३, स्वअर्थशाशित ३२, खाजगी विनाअनुदानित ४, आश्रमशाळा ४, शासकीय आश्रमशाळा १, अंशत अनुदानित २, मदरसा २ अशा एकूण २५२ शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी दिली.
सोमवारी जनजागरण प्रभात फेरी
सोमवारी (दि. २५) तालुक्यातील प्रत्येक महसुली गावात शाळा सुरू करण्याबाबत जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन केले आहे. प्रभात फेरीत शिक्षक, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केले आहे.