जिल्ह्याबाहेरचे पन्नास टक्के रुग्ण घेताहेत बार्शीत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:07+5:302021-04-24T04:22:07+5:30
बार्शी : बार्शी शहर हे गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून शिक्षण, आरोग्य व उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे़ वीस वर्षांपासून तर ...
बार्शी : बार्शी शहर हे गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून शिक्षण,
आरोग्य व उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे़ वीस वर्षांपासून तर बार्शी मेडिकल हब म्हणून उदयास आले आहे. कोरोना महामारीच्या काळात बार्शीच्या डॉक्टर देवदूतांमुळे सध्या शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये एकूण ४७३ रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण अन्य जिल्ह्यांतून येऊन उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या पाहून ऑक्सिजन सिलिंडर व अत्यावश्यक जास्तीच्या सुविधा मिळाव्यात अशीही मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होऊ लागली आहे.
शहरात असलेल्या शेकडो डॉक्टर व हॉस्पिटल्समुळे बार्शी तालुकाच नव्हे, तर सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची सोय त्यामुळे झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या अनुषंगाने आ. राजेंद्र राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली. यावर शहरात उपचार घेत असलेल्या एकूण ४७३ रुग्णांमध्ये २३८ हे बार्शी तालुक्यातील, तर ८७ रुग्ण जिल्ह्यातील माढा, करमाळा व मोहोळ तालुक्यातील आहेत. याशिवाय १४८ रुग्ण उस्मानाबादसह इतर जिल्ह्यांतील असल्याचे समोर आले आहे़
एकंदरीत पन्नास टक्के रुग्ण हे तालुक्यातील, तर उर्वरित पन्नास टक्के हे इतर तालुका व जिल्ह्यातील आहेत.
बार्शी शहर व वैरागमध्ये मिळून दोन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स, तर दहा डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर आहेत. यामध्ये उपचार घेत असलेल्या ४७३ रुग्णांमध्ये २६७ पुरुष, तर २०६ महिलांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बार्शीत सध्या या हॉस्पिटलमध्ये बार्शी तालुक्यातील पन्नास टक्के रुग्ण आहेत.
यात १२३ रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांतील आहेत, तर २५ रुग्ण हे बीड, अहमदनगर, लातूर, परभणी व पुणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.
बार्शीतील दोन डेडिकेटेड हॉस्पिटलमधील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल्समध्ये १७२ रुग्ण दाखल आहेत. त्यात ६५ रुग्ण हे बार्शी तालुक्यातील आहेत, तर उर्वरित १०७ रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील आहेत.
बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण बार्शीत उपचार घेत आहेत. असे असले तरी बार्शी तालुक्यातील साधारणपणे १० ते १५ रुग्ण हे सोलापूर किंवा पुण्यात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नाही.
-----
कोट
माझे वडील डॉ. अंधारे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आमच्या तालुक्यात आरोग्याच्या कोणत्याच सोयीसुविधा किंवा हॉस्पिटल नसल्याने व बार्शीत सर्व तज्ज्ञ डॉक्टर असल्याने आम्ही नेहमीच उपचारासाठी बार्शीलाच येतो.
-
अतुल फरकाळे, पाटसांगवी, ता. भूम
----
कोट
माझेही वडील बार्शीत ॲडमिट आहेत. बार्शीत आल्यावर कोणताही आजार असला तरी रुग्ण लवकर बरा होतो. याठिकाणी चांगले डॉक्टर आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच बार्शीत येतो.
-
अतुल पाटील, म्हैसगाव, ता. माढा
---
ऑक्सिजनसाठी स्वतंत्र टीम
गेल्या आठ दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आम्ही चार वाहने आणि स्वतंत्र चार टीम केवळ ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी कामाला लावलेल्या आहेत. सरकारने बार्शीची रुग्णसंख्या पाहता जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडरसाठी डॉक्टरांना धावपळ करावी लागणार नाही, अशी अपेक्षा डॉ. संजय अंधारे यांनी व्यक्त केली.
----