पन्नास हजार वारकºयांनी केला नावेतून चंद्रभागेत स्वछंद विहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:27 PM2019-07-18T14:27:02+5:302019-07-18T14:30:47+5:30
पंढरपुरातील भक्तांची होडीतून प्रवास : पंढरीतील चारशे ते साडेचारशे कोळी बांधवांचा व्यवसाय; उपजीविकेचे मुख्य साधन
यशवंत सादूल
पंढरपूर : आषाढीला पंढरीत दाखल झालेले वारकरी गोपाळकाला करून परतीच्या प्रवासाला लागले आहेत. विठुदर्शनाने तृप्त झालेल्या बहुतेक भक्तांची ओढ असते ती चंद्रभागेत नावेतून स्वछंद विहार करण्याची. नदी परिसरातील सर्व मंदिरातील देवतांचे दर्शन घेत गोपाळपूरपर्यंत नौकाविहाराचा आनंद घेत असतात. यंदा जवळपास पन्नास हजार वारकरी व इतर भक्तांनी या होडीतून प्रवास केला आहे.
चंद्रभागा स्नान, नामदेव पायरी दर्शन अन् विठ्ठलाच्या दर्शनानंतर बहुतेक वारकºयांचे पाय आपोआप वळवंटाकडे वळतात. नदीपात्रालगत असलेल्या नारदमुनी, हरे कृष्ण, म्हसोबा मंदिर, राघोजी भांगरे स्मारक यासोबत नावेतून गोपाळपूरला जाऊन गोपालकृष्णाचे दर्शन घेण्यात भक्त स्वत:ला धन्य मानतात. दिंड्या आळंदीतून निघाल्या की, पंढरीकडे भक्तांचा ओघ सुरू होतो. त्यासोबत नावेतून प्रवास करणाºया भक्तांची संख्या वाढत जाते.
महादेव कोळी समाजाच्या होडी चालक-मालक संघाच्या दोनशे होडी भक्तांच्या सेवेत आहेत. एका खेपेस वीस ते तीस प्रवासी होडीतून विहार करतात. पंढरीतील चारशे ते साडेचारशे कोळी बांधव या नाव वल्हविण्याच्या व्यवसायात असून, त्यांच्या उपजीविकेचे हे मुख्य साधन आहे. वर्षातील चारही वारीत यांची सेवा अखंडपणे सुरू असते. नौकाविहारामुळे चंद्रभागेतील पाणी वर्षभर स्वच्छ राहण्यास मदत होते.
वारकरी भक्तांना विरंगुळ्यासह देवांचे दर्शन होते. पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत उत्तम प्रचंडे, दिलीप कोरे, रामभाऊ कोळी, पुंडलिक प्रचंडे, पोपट कोरे यांनी व्यक्त केले.
सागवान, सुबाभूळ, निलगिरी लाकडाचा वापर
- एक नाव तयार करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो. ती दहा ते बारा वर्षे टिकते. त्यासाठी सागवान, सुबाभूळ, निलगिरी लाकडाचा वापर केला जातो. नावेची लांबी वीस फूट असते तर रुंदी मध्यभागी सात फूट असते. दोन्ही बाजूस निमूळते होत रुंदी कमी होत एक फूट ते सहा इंच होते. उंची अडीच ते तीन फूट असते. नावेच्या मागील बाजूस चांदा तर पुढील बाजूस मोहरा किंवा घोडा, असे संबोधले जाते. नाव वल्हविणाºयाच्या मागील बाजूस हा मोहरा असतो. ही जागा सात फूट लांब व तीन फूट रुंद असते.
कोळी बांधवांची सामाजिक बांधिलकी
- पंढरपूरच्या कोळी बांधवांकडून नाव चालविण्याबरोबरच बुडणाºया भाविकांना वाचविण्याचे काम केले जाते. या वर्षभरात दोनशेहून अधिक लोकांचे प्राण वाचविण्यात आले. नदीपात्रातील बेवारस प्रेत काढणे, चोरी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे, नदीपात्र स्वच्छ राखण्यासाठी प्रशासनाला मदतीची भूमिका असते. वारीनंतर वाळवंटात आढळून येणारे मतिमंद, हरवलेल्या व्यक्तींना पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे कामसुद्धा केले जाते, अशी माहिती होडीचालक संघाचे प्रमुख गणेश अंकुशराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.