मुलगा १४ वर्षांचा असल्यापासून लढा; नातू १० वर्षांचा झाल्यानंतर मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:28+5:302021-09-03T04:23:28+5:30
शेतकरी पांडुरंग चौगुले यांची जमीन सन १९८९ साली कॅनाॅलसाठी आरक्षित करण्यात आली होती. त्यांच्या गटातील गट नं. २२ ...
शेतकरी पांडुरंग चौगुले यांची जमीन सन १९८९ साली कॅनाॅलसाठी आरक्षित करण्यात आली होती. त्यांच्या गटातील गट नं. २२ सह इतर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या होत्या. जमिनीचा मोबदला घेऊन जाण्याबाबत इतर शेतकऱ्याना पत्र आली. मात्र, पांडुरंग चौगुले यांना पत्रच आले नाही. तुमची जमीन कॅनॉलमध्ये गेली आहे. एवढीच नोटीस त्याना देण्यात आली होती. मोबदला सर्वांना मिळाला. परंतु पांडुरंग चौगुले यांना एक दमडीही मिळाला नाही. तो मोबदला मिळावा, म्हणून १९८९ पासून पांडुरंग यांनी शासन दरबारी हेलपाटे चालू केले. सगळ्यांनी कागद पाहून मोबदला देण्याचे आश्वासन दिले. मात्र, हातात काहीच मिळालं नाही. म्हणून अखेर पांडुरंग चौगुले यांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. शेवटी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर तब्बल ३२ वर्षे झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले व मोबदला म्हणून चौगुले यांना १२ लाख ७० हजार रुपये मंजूर केले. त्याचा धनादेश २ सप्टेंबर रोजी तहसीलदार राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, माजी सरपंच मधुकर पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, सहाय्यक अभियंता एफ. आर. मुजावर, कनिष्ठ अभियंता पी. टी. कांबळे, गणेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पांडुरंग चौगुले, त्यांचा मुलगा भारत चौगुले व नातू गुरुनाथ चौगुले यांना देण्यात आला.
....चौकट ....
मुलगा अज्ञान असताना संघर्ष सुरू केला होता. परंतु सर्व ठिकाणी प्रयत्न करून केवळ आश्वासनेच मिळत होती. त्यामुळे पैसे मिळतील ही अशा सोडून दिली होती. परंतु केलेली आंदोलने व सततच्या पाठपुराव्यामुळे मला न्याय मिळाला. मी खूप आनंदी आहे.
-पांडुरंग चौगुले, शेतकरी
फोटो ..
कॅनॉलसाठी संपादीत जमिनीच्या मोबदल्याचा पांडुरंग चौगुले यांना चेक देताना तहसीलदार राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, समवेत पांडुरंग यांचा मुलगा भारत चौगुले व नातु गुरुनाथ चौगुले.
.....
फोटो ०२मोहोळ शेतकरी