पाईपलाईन अन् पाण्याच्या कारणावरुन पेनूर येथे हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:37+5:302021-03-28T04:21:37+5:30

मोहाेळ : पाईपलाईनच्या कारणावरुन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व विरोधी पक्षातील सदस्य व अन्य व्यक्तीं यांच्यामध्ये झालेल्या वादातून ...

Fighting at Penur over pipeline water | पाईपलाईन अन् पाण्याच्या कारणावरुन पेनूर येथे हाणामारी

पाईपलाईन अन् पाण्याच्या कारणावरुन पेनूर येथे हाणामारी

Next

मोहाेळ : पाईपलाईनच्या कारणावरुन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व विरोधी पक्षातील सदस्य व अन्य व्यक्तीं यांच्यामध्ये झालेल्या वादातून परस्पर विरोधात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांसह ३४ जणावर मोहोळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. २६ मार्च रोजी दुपारी पेनूर येथे हा प्रकार घडला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पेनूर येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीजवळ पाण्याच्या पाईपलाईन कामावरून दोन गटात वाद झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे यांना धक्काबुक्की झाली. मारहाण झाली. याप्रकरणी विठ्ठल माने, शरद पोरे, अंकुश चवरे, तानाजी सावंत, लक्षण चवरे व अन्य सात अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या वादानंतर पेनूरचे ग्रामसेवक संतोष पाटील हे याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मोहोळला गटविकास अधिकारी यांच्याकडे निघाले असता, तू ऑफिसच्या बाहेर जायचे नाही म्हणत ग्रामसेवकाच्या गच्चीला धरून खुर्चीवर बसवले. याप्रकरणी विठ्ठल माने आणि शरद पोरे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी संतोष पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

ही घटना घडल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान अनिल राजगुरू हे गावातील मंदिराजवळ थांबले होते. ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे यांनी तू राहतो ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे, ती आता आम्ही ताब्यात घेणार आहोत म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ग्रामसेवक संतोष पाटील, रामदास चवरे, राजकुमार सलगर, सुधीर मांदे, बाळासाहेब चवरे, रमेश माने यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

याचवेळी देवानंद चवरे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये ग्रामपंचायतीच्या बोअरच्या पाईपलाईनवरुन तक्रार झाली. या तक्रारीदरम्यान विठ्ठल माने यांना होणारी मारहाण सोडविण्यासाठी ते तिथे गेले असता रामदास चवरे यांनी मारहाण केली. गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन ओढून घेऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी रामदास चवरे, चरणराज चवरे, राजकुमार सलगर, सागर चवरे, बाळासाहेब चवरे व अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा नोंदला आहे.

दरम्यान २६ मार्च रोजी दुपारी ३.१५ चे दरम्यान मुस्लिम दफनभूमी जवळील पाण्याच्या बोअरला हात लावल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुहास कुमार आवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानाजी माने, सर्जेराव चवरे, दिग्विजय माने, सज्जन चवरे, देवानंद चवरे, सर्जेराव पवार, तानाजी सावंत, रजनीकांत चवरे, दत्ता सावंत यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

----

एकाच दिवशी परस्परविरोधी पाच तक्रारी

एकाच दिवशी पेनूरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शासकीय कामात अडथळा, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी व मारहाण झाल्याच्या कारणावरुन परस्परविरोधी पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळाला जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

Web Title: Fighting at Penur over pipeline water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.