कोंडी येथे शिवसेनेच्याच गटात लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:11+5:302021-01-10T04:17:11+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, आता काही बोटावर मोजण्याइतक्या गावांत सध्या शिवसेना सक्रिय आहे. त्यापैकी ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, आता काही बोटावर मोजण्याइतक्या गावांत सध्या शिवसेना सक्रिय आहे. त्यापैकी कोंडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व आहे. २०१० पर्यंत कोंडी गावातील शिवसेना एकसंघ होती. नंतर स्थानिक पातळीवर शिवसेनेत दोन गट पडल्याने २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेत दोन गट झाले. विक्रांत काकडे व इतरांचा एक तर दिवंगत शंकर पाटील, शिवाजी नीळ समर्थकांचा दुसरा गट. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या या दोन गटांत सामील होतात. २०१५ प्रमाणे २०२१ च्या निवडणुकीसाठीही शिवसेनेच्या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे यांच्या गटाच्या सरपंच चंद्रभागा वाघमारे हे पुन्हा निवडणूक लढवित आहेत. सरपंच वाघमारे यांचा मुलगा योगेश वाघमारे हाही निवडणूक लढवित आहे. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी भोसले यांची भावजय सुनिता भोसले या नशीब आजमावत आहेत.
तिर्हेत जाऊबाईमध्येच लढत
तिर्हे ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये स्वाती सुरवसे यांच्या विरुद्ध शुभांगी प्रदीप सुरवसे या जाऊबाईमध्येच रंगतदार लढत आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.