स्वॅब देण्यासाठी रुग्णास न पाठविणाºया कर्णिकनगरातील डॉक्टरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:32 PM2020-08-20T12:32:05+5:302020-08-20T12:36:06+5:30
क्लिनिकची तपासणी; महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई
सोलापूर : कोरोना संशयित रुग्णांना स्वॅब टेस्ट देण्यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात न पाठविल्याप्रकरणी कर्णिकनगर येथील डॉ. शशिकांत खजुरगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हे दुसरे प्रकरण आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी या क्लिनिकला भेट देऊन तपासणीअंती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनासदृश आजाराचे रुग्ण खासगी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी जात आहेत. उपचारानंतरही बरे होत नसल्याने इतर रुग्णालयांमध्ये फिरत आहेत. एखाद्या डॉक्टरकडे कोरोनासदृश रुग्ण तपासणीसाठी आल्यास त्याला महापालिकेच्या स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये पाठविण्यात यावे, अन्यथा त्याच्यावर कारवाई होईल, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेचे मजरेवाडी येथील नागरी आरोग्य केंद्र, दाराशा प्रसूतिगृह, मुद्रा सन सिटी, बॉईस प्रसूतिगृह आदी ठिकाणी स्वॅब टेस्टची सोय करण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वॅब टेस्ट करण्याचा सल्ला देताना या रुग्णांची नोंद आपल्याकडे ठेवावी, असेही आयुक्तांनी बजावले आहे.
दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त अजयसिंह पवार, आरोग्य अधिकाºयांनी शहरातील विविध क्लिनिकची पाहणी केली. या पाहणीत कर्णिकनगर येथील डॉ. शशिकांत खजुरगी यांच्या क्लिनिकला भेट देण्यात आली. या भेटीत त्यांच्या कामात अनियमितता आढळली. आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या नोंदी नव्हत्या. याशिवाय मनपाकडे अहवालही पाठविण्यात आलेले नव्हते. या प्रकरणाचा तपास करून डॉ. खजुरगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पी. शिवशंकर यांनी दिले. यल्लप्पा पल्लेलू यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
तीन जणांना नोटीस
आपल्या रुग्णालयांनी कोरोनासदृश रुग्णांबाबतची माहिती मनपाच्या नियंत्रण कक्षाला आणि आरोग्य विभागाला न कळविल्याबद्दल डॉ. मोनाली देशमुख (अवंतीनगर), डॉ. नफिसा शेख (नीलमनगर), डॉ. अमोल देशमुख (अवंती नगर) यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा समाधानकारक नसेल तर या तिघांवरही कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिला.