राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; हिंदू महासभेची मागणी, सोलापुरात दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:58 PM2019-01-28T12:58:35+5:302019-01-28T15:11:28+5:30
सोलापूर : भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल ...
सोलापूर : भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यंगचित्र काढले आहे, यामध्ये त्यांनी भारतमातेचे चित्र रेखाटले असून तिला फाशी दिली आहे. भारतमातेला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोरीने फाशी देत असल्याचे व्यंगचित्र त्यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर प्रसिद्ध केले आहे.
व्यंगचित्र काढून त्यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांनी भारत मातेचा सरळ सरळ अपमान केला असून, संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या कृत्यासाठी राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी तक्रारी अर्जातून केली आहे.
धमक्या आल्या तरी घाबरणार नाही : बहिरवाडे
राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी व्यंगचित्रे काढून भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. गणपती, श्री राम यांचेही व्यंगचित्र काढून राज ठाकरे यांनी नाराजी ओढवून घेतली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचे व्यंगचित्र काढल्याने आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. राजकीय विषयावर त्यांनी काही करावे, काही गोष्टींमध्ये आम्हीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध केला आहे.
भारतमातेचे विडंबन करण्याचा त्यांना अधिकार नाही.
- फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी याची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना भेटून सोलापुरात गुन्हा दाखल करून जिथे व्यंगचित्र काढले आहे, तिथे वर्ग करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने केली जाणार आहे, असे सुधाकर बहिरवाडे यांनी सांगितले.
शिवसेनेचा पाठिंबा...
- भारत मातेला फाशी देणारे व्यंगचित्र काढल्याप्रकरणी हिंदू महासभेच्या निषेधाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. ते आमच्या सोबत असल्याची माहिती सुधाकर बहिरवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.