कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:30 AM2020-09-05T11:30:55+5:302020-09-05T11:34:13+5:30
विधानसभा अध्यक्षांनी आमदार राम कदमांवर कारवाई करण्याची केली मागणी
सोलापूर : महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे.
कंगना रनौत यांनी महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला आहे. मुंबईमध्ये राहून करोडो रुपये कमवायचे, नावारूपास यायचे व त्याच महाराष्ट्राला व मुंबईला ड्रगमाफियाशी जवळीक ठेवून बेताल वक्तव्य करायचे. अशा व्यक्तींचा महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदोबस्त केला पाहिजे. ९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येणार आहे, कोणाची हिंमत आहे, मला कोण आडवतंय मी पाहते, असे जाहीर आव्हान कंगनाने प्रशासनाला दिले आहे. मस्तवाल कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून वेळीच कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, विभागीय संघटक महेश धाराशिवकर, परिवहन सदस्य विजय पुकाळे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
-------------
आमदार राम कदमवर कारवाई करावी
भाजपचे आमदार राम कदम हे कंगना रनौत यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांनी कंगना रनौत यांची पाठराखण केली असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करून सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षड्यंत्र आहे. या कृतीची दखल घेऊन शासनाने व विधानसभा अध्यक्षांनी राम कदम यांच्या सदस्यत्वाच्या बाबतीत कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.