अकलूजच्या ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध खंडणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:16+5:302021-03-22T04:21:16+5:30
लवंग (ता. माळशिरस) येथील अक्षय धनाजी शिंदे या युवकाचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून अक्षय शिंदे याने ...
लवंग (ता. माळशिरस) येथील अक्षय धनाजी शिंदे या युवकाचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून अक्षय शिंदे याने त्या मुलीचे एक वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचे मुलीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार १८ मार्चला अक्षय शिंदे याच्यावर लैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अक्षयला सोमवारपर्यंत (दि.२२) पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याचा तपास पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू करत आहेत.
पुढील तपास सुरू असताना असे निष्पन्न झाले आहे की, अकलूज ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांनी पीडित मुलीला तुझा प्रियकर मिळवून देते व वरून पैसेही मिळवून देते, असे आमिष दाखवले. त्यानंतर ज्योती कुंभार यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांकडे १५ लाखांची मागणी केली. त्यापैकी एक लाख २५ हजार रुपये ज्योती कुंभार यांनी शिंदे कुटुंबीयांकडून घेतले. दरम्यानच्या काळात कुंभार यांनी अक्षय शिंदे व पीडितेला मारहाण केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात ज्योती कुंभारलाही आरोपी करण्यात आले आहे. कुंभार हिच्यावर खंडणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी(दि. २१) कुंभारला न्यायालयासमोर हजर केले असता तिला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू करत आहेत.
वाद मिटविण्यासाठी केली मध्यस्थी
या गुन्ह्यातील अक्षय शिंदे हा अकलूज येथील एका खासगी दवाखान्यात नोकरीस होता. त्याचे नर्सिंग सेवा देणाऱ्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. आंतरजातीय संबंधांना मुलाच्या कुटुंबीयांचा जोरदार विरोध होता. या दोघांनी लग्न केल्याचेही भासवले आहे. कुटुंबीयांच्या दबावानंतर मुलगा मुलीपासून दूर झाला. त्यावेळेस हा वाद मिटवण्यासाठी ज्योती कुंभारने मध्यस्थी केली. त्यातून पुढील गैरप्रकार घडले आहेत. अकलूज ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनपेक्षितपणे विजयी झालेल्या ज्योती कुंभार या खंडणी व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यात अडकल्या आहेत.