सोलापूरातील रेल्वेस्थानकावर स्वच्छतेसाठी ‘मेकॅनाईज’ मशीन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:00 AM2018-09-20T11:00:06+5:302018-09-20T11:02:55+5:30
सफाई : पूर्वीचे मानाचे स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न
सोलापूर : स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले सोलापूररेल्वे स्थानक मागील वर्षी ५० व्या क्रमांकावर गेले होते़ आता पुन्हा १ ते १० मध्ये येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी आज स्थानकावर स्वच्छता करणारी नव्याने पाच मेकॅनाईज मशीन दाखल झाल्या.
स्टेशन संचालक गजानन मीना आणि स्टेशन व्यवस्थापक सुशीलकुमार सिंग यांच्या उपस्थितीत या मशीनचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी स्थानक स्वच्छता करवून घेणारे समन्वयक श्रीकांत जाधव आणि स्वच्छता करणारे पथक उपस्थित होते़ त्यांना मशीनबाबत माहिती देण्यात आली़ यंदा स्थानक आणि परिसर स्वच्छतेचे काम जबलपूरच्या एच़ एस़ सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले आहे़ पूर्वी हेच काम सोलापूरमधील प्रभाकर एंटरप्रायजेसकडे होते़ रेल्वेच्या पाचही स्थानकांवर या मशीनच्या माध्यमातून स्वच्छता करवून घेतली जाणार आहे़
स्थानकाच्या स्वच्छतेचा आराखडा
- २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेबाबत मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे़ त्या पार्श्वभूमीवरच या स्वच्छता मशीन मागवण्यात आल्या आहेत़ दुपारी रेल्वेचे आरोग्य निरीक्षक अमोल इंगळे, संदीप बिराजदार यांनी स्टेशन संचालकांच्या उपस्थितीत पाहणी करून एक आराखडा केला आहे़ दिवसातून अर्थात २४ तासांमध्ये तीन पाळ्यांमध्ये ही स्वच्छता केली जाणार आहे़