सावकारी जाचाला कंटाळून चित्रपट निर्मात्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:17 AM2018-05-21T01:17:21+5:302018-05-21T01:17:21+5:30
खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते.
सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (३८) यांनी रविवारी घरात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. या अर्जाची प्रत आता स्थानिक पोलिसांना देण्यात आल्याचे पडाल कुटुंबीयांनी सांगितले.
कल्याण यांचे ज्येष्ठ बंधू प्रा़ व्यंकटेश पडाल यांनी सांगितले की, ‘बांधकाम व्यवसायातून जमवलेले काही पैसे कल्याणने ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवले़ दुर्दैवाने कल्याणला यकृताचा कर्करोग झाल्याचेही निष्पन्न झाले़ या धक्क्याने वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले़ तसेच कर्करोग उपचारांसाठी कल्याणने खासगी सावकाराकडून काही पैसे घेतले होते़ त्यामुळे सावकारांचा तगादा सुरू होता़’
पडाल यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे़ स्थानिक नागरिक व मित्र परिवारातही शोक व्यक्त होत आहे़ हरहुन्नरी निर्माता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे़